Pandharpur wari : वारीचा उत्साह शिगेला! आज तुकोबाराय महाराज तर उद्या माऊलींची पालखी पंढरीकडे ठेवणार प्रस्थान; प्रशासनाची तयारी कशी? वाचा…
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमऱ्यांची नजर असणार आहे. चोरीच्या घटना घडू नये, यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणी या पथकांची नजर असणार आहे.
देहू, पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसाठी आळंदीनगरी सज्ज झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते दुपारी 2 वाजता देहू येथून तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. मुख्य मंदिर, पालखी आणि रथ (Chariot) फुलांनी सजविण्यात आला आहे. इंद्रायणी नदीच्या काठी वारकऱ्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच ठिकठिकाणी वैष्णवांचा मेळा रंगला आहे. दोन वर्षानंतर पायी सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्येदेखील मोठा उत्साह आहे. कालपासून पोलीस (Police) बंदोबस्तदेखील वाढविण्यात आला आहे. मुख्य मंदिर परिसरासह सर्व देहू नगरीमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 100 अधिकारी,700 पोलीस कर्मचारी त्याचप्रमाणे ट्रॅफिकसाठी 300 अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संपूर्ण पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही कॅमऱ्यांची नजर असणार आहे. चोरीच्या घटना घडू नये, यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणी या पथकांची नजर असणार आहे.
पीएमपीएमएलतर्फे सेवा
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त पीएमपीएमएलच्या वतीने वारकऱ्यांसाठी ज्यादा बस सोडण्यात येत आहेत. काल पहिला टप्पा होता. या माध्यमातून ज्यादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. तर आजदेखील दुसऱ्या टप्प्यात आणखी जास्त गाड्या सोडण्यात येत आहेत. वारकऱ्यांनीदेखील बसने सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन पीएमपीएमएलच्या वतीने करण्यात आले आहे.
‘या’ मार्गांवर असणार सुविधा
– देहू ते पुणे स्टेशन
– देहू ते आळंदी
– देहू ते देहूरोड
– देहू ते निगडी
– देहू ते हिंजवडी
आरोग्याची काळजी
या मुख्य मार्गावरील प्रवासी देहूत संत तुकोबांच्या दर्शनाला येतील तसेच निगडी येथून अनेक मार्गावर या बसेस धावतील, असे पीएमपीएमएलतर्फे सांगण्यात आले आहे. कोविड तसेच पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत नगर पंचायतकडूनदेखील तयारी करण्यात आली आहे. डेंग्यू, मलेरिया किंवा अन्य साथीचे आजार होऊ नये, म्हणून पूर्ण देहूत रोज धूर फवारणी सुरू आहे. देहूच्या मुख्य मंदिरात धूर फवारणी करण्यात येत आहे.