पुणे : जेम्स लेनप्रकरणी (James Laine) मी कोणतेही वक्तव्य केले नाही. ज्यांनी त्याच्यासंदर्भातमध्ये मी काहीही बोलू शकत नाही. कारण नसताना कोणत्याही पावत्या माझ्या नावावर फाडू नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. जेम्स लेन प्रकरणावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्याकडून मी कोणतीही चुकीची माहिती घेतली नाही, असे नुकताच जेम्स लेन म्हणाला होता. त्यावर अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली, तेव्हा ते बोलत होते. देशात सध्या इतर मुद्दे आहेत. त्यावर आपण चर्चा करू. हे जुने मुद्दे काढून कशा कुणाच्या भावना भडकतील, कुणामध्ये कशी संभ्रमावस्था निर्माण होईल, हे पाहण्याचे काम आपले नाही. माध्यमांनीही हे दाखवणे कमी करावे आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
दिल्लीतील घटनेचा निषेध करत ते म्हणाले, की सर्व जातीधर्मात एकोपा राहावा, कोणत्याही धर्मात तेढ निर्माण होऊ नये, असा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. दिल्लीत झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत व्यक्त केले. इतर देशांची जसे श्रीलंका, पाकिस्तान यासारख्या देशात काय चालले आहे, याचा विचार करा. आपला मोठा देश एकोप्याने राहावा, याचा प्रयत्न सर्वांनी करावा, हे संविधानात सांगितले आहे. त्याचा अवलंब करावा, असे ते म्हणाले.
जाधव ताईंबरोबर आम्हाला एकसंघपणे काम करावे लागेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला. त्यांचे अभिनंदन करताना जनतेचेही अजित पवार यांनी आभार मानले. तसेच चंद्रकांत पाटील यांच्याविषयी बोलणे टाळले.