Pune crime : बंदी असतानाही अवैधरित्या दारूविक्री सुरूच, कल्याणीनगरातल्या दोन हॉटेल्सवर कारवाई
उत्सव काळातील इतर दिवशी दिलेल्या वेळेनंतरदेखील दुकानदार दारू विक्री चालु ठेवतात. अशा बेकायदा कामास आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे : दारूविक्रीस बंदी असतानाही ती अवैधरित्या विक्री (Illegal sale of liquor) होत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोन हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे. प्रादेशिक उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. दारू विक्रीच्या आरोपाखाली या दोन हॉटेल्सना पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सध्या सुरू असलेल्या गणपती उत्सवादरम्यान जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने पाच दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यासाठी भरारी पथकेदेखील तयार करण्यात आली आहेत. या माध्यमातून छापे (Raid) टाकण्यात येत आहेत. अशाप्रकारच्या कारवाईचा इशाराही आधीच देण्यात आला होता. मात्र तरीदेखील काही ठिकाणी याचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे.
खासगी हॉटेल्सवर छापे
भरारी पथकाने गणेशोत्सवाच्या या कालावधीत कल्याणीनगरमधील अनेक खासगी हॉटेल्सवर छापे टाकले. त्यापैकी दोघांवर राज्य उत्पादन शुल्क कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विसर्जन दिवसापर्यंत शहरात छापेमारी सुरूच राहणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
दारू, मोबाइल जप्त
पुणे पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायद्यान्वये 41 गुन्हे दाखल केले असून शोध मोहिमेदरम्यान 49,150 रुपये किंमतीची 309 लिटर देशी दारू आणि दोन मोबाइल फोन जप्त केले आहेत.
‘कठोर कारवाई सुरूच राहणार’
पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सीबी राजपूत म्हणाले, की यासंबंधीची सुनावणी पूर्ण होईपर्यंत दोन्ही हॉटेल्स बंद राहणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दारूविक्रीच्या संदर्भातील नियम, अटी स्पष्ट दिल्या आहेत. यासंबंधी निवेदनही प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलांवर कठोर कारवाई करणार आहोत.
जिल्हाधिकाऱ्यांचा नेमका आदेश काय?
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी गणेशोत्सवापूर्वी एक पत्रक प्रसिद्ध केले. यानुसार, 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मद्यविक्री करणारी दुकाने, परमीट रूम आणि बिअर बार पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. दिनांक 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस जिल्ह्यातील दारू दुकाने बंद राहणार. 10 तारखेला विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत महापालिका क्षेत्रातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
विशेष पथकांची नियुक्ती
उत्सव काळातील इतर दिवशी दिलेल्या वेळेनंतरदेखील दुकानदार दारू विक्री चालु ठेवतात. अशा बेकायदा कामास आळा घालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांमार्फत अचानक तपासणी केली जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.