झेपत नसेल तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; सुप्रिया सुळे कडाडल्या
संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणीत झालेल्या राड्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फैलावर घेतलं आहे. झेपत नसेल तर गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या, अशी मागणीच त्यांनी केली आहे.
पुणे : संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपूर्वी राडा झाला. दोन गटात तुफान हाणामारी झाली. दगडफेक करण्यात आली. जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे संभाजी नगरमध्ये तणाव पूर्ण शांतता पसरली होती. अजूनही संभाजीनगरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. संभाजीनगरपाठोपाठ मुंबईतील मालवणीतही दोन गटात राडा झाला. या सर्व राड्यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात दंगल झाली आहे. या गोष्टी गंभीर आहेत. त्यामुळे झेपत नसेल तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीच सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
लोकप्रतिनिधींना वारंवार अशा धमक्या येईपर्यंत गुन्हेगार निर्ढावले आहेत, याचा अर्थ गृहखात्याचा वचक,दरारा नाही काय? संसदेचे खासदार आणि महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते संजय राऊत यांना एका व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. देशातील एका लोकप्रतिनिधीला जर अशाप्रकारे धमकी दिली जात असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे संजय राऊत यांना तात्काळ झेड प्लस सेक्युरिटी द्यावी. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात लक्ष घालावं. राऊत देशातील वरिष्ठ नेते आहेत. मोठे खासदार आहेत. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे दडपशाहीचं सरकार
केंद्र तसेच महाराष्ट्र सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्याची गरज आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असं सांगतानाच वाचाळवीरांचं हे सरकार आहे. मंत्री आणि आमदार काही बोलले तरी मला काही आश्चर्य वाटणार नाही. त्यांच्याकडून काही अपेक्षा नाही. दडपशाहीचं सरकार आहे. काहीही होऊ शकतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
गलिच्छ राजकारण होता कामा नये
दरम्यान, भाजपचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाला तीन दिवस उलटले नाही तोच पुण्यात पोस्टरबाजी सुरू झाली आहे. भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे शहरात पोस्टर लागले होते. त्यावर भावी खासदार असा उल्लेख होता. त्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. हा प्रकार अतिश दुर्देवी आहे. अजितदादा काल यावर सविस्तर बोलले आहेत. बापट साहेब जाऊन तीन दिवस झाले. त्या धक्क्यातून आपण बाहेर पडलेलो नाही. त्यानंतर असं गलिच्छ राजकारण होता कामा नये, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी जगदीश मुळीक यांना नाव न घेता सुनावले आहे.