dilip walse patil : शरद पवारांचा देशात नवीन राजकारण करण्याचा प्रयत्न; दिलीप वळसे पाटलांनी दिले तिसऱ्या आघाडीचे संकेत
dilip walse patil : पवारसाहेब देशातील सर्व पक्षातील नेत्यांना एकत्र करण्याच काम करत आहेत. नव्याने काही मांडण्याचा व करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
पुणे: एकीकडे काँग्रेसने संघटन बांधणीवर जोर दिला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून (ncp) वेगळेच संकेत दिले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी आज मोठं विधान केलं आहे. देशाची अर्थव्यवस्था खाली गेली आहे. उद्योगधंदे खाली गेले आहेत. रोजगारांच्या संधी कमी झाल्या आहेत. महागाई वाढत आहे आणि केंद्र सरकार एक एक प्रकल्प बाजारात विकायला लागलं आहे. उत्पादनाचं साधनच नाही. विकायचं आणि मजा मारायची करायची ही भूमिका दिल्लीच्या सरकारची आहे. म्हणून राज्यात तर आपलं सरकार पाहिजे आणि दिल्लीतही आपल सरकार पाहिजे. यासाठी शरद पवार (sharad pawar) हे देशात नवीन राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं सांगत दिलीप वळसे पाटील यांनी थेट तिसऱ्या आघाडीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
दिलीप वळसे पाटील आज शिरुरमध्ये होते. यावेळी त्यांनी हे संकेत दिले. राज्यातही आपलं सरकार असलं पाहिजे. केंद्रातही आपलंच सरकार पाहिजे. त्यासाठी पवारसाहेब देशातील सर्व पक्षातील नेत्यांना एकत्र करण्याच काम करत आहेत. नव्याने काही मांडण्याचा व करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
दोषींवर कारवाई होईल
यावेळी त्यांनी अभिनेत्री केतकी चितळेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या पोस्टच्या निषेधार्थ काल ठाण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती अंडी फेकली होती. या घटनेची स्थानिक पोलीस चौकशी करून जे कुणी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करतील, असं त्यांनी सांगितलं.
प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा असतात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याबाबत जे बोलतील त्यांना जशास तसे उत्तर देऊ असं म्हटलं होतं. त्यावर कार्यकर्त्यांनी असे करू नये. भावना असतात हे मान्य आहे. पण प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा असतात. त्याचे पालन केले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.
विनाकारण टीका करतात
पवार साहेब सतत लोकांसाठी काहींना काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रकृती ठिक नसताना ते काम करत असतात. पण काही लोक पवार साहेबांवर विनाकारण काही संबंध नसताना खालच्या भाषेत टीका करतात. मात्र काही लोक याविरोधात पुढे का येत नाही, असा सवालही त्यांनी केला.