पुणे : पुण्यातील शिरूर तालुक्यात काल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल (Gram panchayat election result) लागला. मात्र या निवडणुकीत सर्वात जास्त चर्चा झाली ती टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीची. कारण राष्ट्रवादीच्याच विरोधात राष्ट्रवादीची (NCP) लढत पाहायला मिळाली या परिसरात टाकळी हाजीसह माळवाडी, शरदवाडी, म्हसे, टाकळी हाजी या ग्रामपंचायतींवर घोडे गटाने वर्चस्व मिळवले. त्याला कारणही तसेच आहे. राष्ट्रवादीचेच दामुशेठ घोडे हे किंगमेकर ठरले. त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. ही माझी निवडणूक नसून माझे लग्न (Marriage) आहे, असे विधान टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणूक प्रचारादरम्यान घोडे यांनी केले होते. या एका वाक्यावर त्यांनी ही निवडणूक जिंकली आहे. त्यानंतर त्यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी पुन्हा लग्न करून शब्द पाळून दाखवला.
या लग्न सोहळ्यासाठी घरातील मंडळींसह सर्व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विवाह सोहळ्याची (Marriage ceremony) चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. निवडणूक प्रचाराच्या सभेत दामुशेठ घोडे यांनी लोकांना भावनिक आवाहन करताना ही निवडणूक नसून हे माझे लग्न आहे. मी चार नंबर प्रभागाचा नवरदेव आहे. तर एक नंबर प्रभागमधून अरूणाताई माझी नवरी असून दोन नंबर प्रभागातील त्यांची उभी असलेली सुनबाई ही आमची कलवरी आहे. तुम्ही सर्वजण माझे वऱ्हाडी आहात आणि निकाल म्हणजेच माझे लग्न असेल. अशा प्रकारे केलेल्या विधानावर ‘बोलतो ते करतो आणि करतो तेच बोलतो’ हे सिद्ध करून दाखवत घोडे यांनी टाकळी हाजी येथील निवडणूक जिंकली आहे.
निकाल लागल्यानंतर टाकळी हाजी येथील कुंड पर्यटन स्थळ येथील मंगल कार्यालयात जाऊन एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. या दिमाखदार सोहळ्याची चर्चा शिरूर तालुक्यासह जिल्ह्यात सर्वत्र होत असून चक्क या विवाह सोहळ्यास घोडे दाम्पत्याचे सर्व कुटुंब उपस्थित होते.
शिरूर तालुक्यात टाकळी हाजी येथे दामुशेठ घोडे आणि पोपटशेठ गावडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते… त्यांनी त्यांच्या प्रभागातून सलग पंधरा वर्षे निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा ठेवली होती. मात्र माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या सोबत राजकीय मतभेद झाले. त्यामुळे यंदाची निवडणूक पार पडली आणि घोडे गटाने विजय खेचत राष्ट्रवादीचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या वर्चस्वाला धक्का निर्माण केला आहे.