Pune : रोगांना आमंत्रण देतेय वाढती आर्द्रता; खोकला, सर्दी, ताप, अंगदुखीच्या पुणेकरांच्या तक्रारी; कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचाही धोका कायम
एकीकडे हवामान बदलामुळे सर्दी, ताप, खोकला या आजारांसह कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यात हवामानही अशा संक्रमणासाठी पोषक असल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागातर्फे करण्यात आल्या आहेत.
पुणे : पुण्यात वाढती आर्द्रता (Humidity) आणि पाऊस कुठेच दिसत नसल्याने अनेकांना फ्लू, सर्दी, खोकला या आजारांनी ग्रासले आहे. शहरातील डॉक्टरांनी तापमान आणि आर्द्रतेतील चढउतारांमुळे सामान्य फ्लूच्या रुग्णांमध्ये किमान 10% वाढ नोंदवली आहे. डॉक्टरांच्या मते, बहुतेक कमी प्रतिकारशक्ती (Low immunity) असलेले रुग्ण ज्यात ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गर्भवती महिलांचा समावेश होतो, अशांमध्ये खोकला, सर्दी, ताप आणि अंगदुखीच्या तक्रारी दिसून येत आहेत. भरपूर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जात आहे आणि सुरक्षित राहण्यासाठी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्लादेखील दिला जात आहे. रुग्णांनी बाहेरचे खाणे टाळत घरगुती अन्न आणि फळे खावीत तसेच भरपूर पाणी प्यावे. ऋतू (Season) बदलताना असे संक्रमण होऊ शकते, मात्र याकडे दुर्लक्ष करू नये, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका
एकीकडे हवामान बदलामुळे सर्दी, ताप, खोकला या आजारांसह कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यात हवामानही अशा संक्रमणासाठी पोषक असल्याने खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागातर्फे करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या ‘बीए.4’ आणि ‘बीए.5’ या व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन ती संख्या आठपर्यंत गेली आहे. कोरोनाचा व्हेरिएंट कोणता, याचे निदान करण्यासाठी जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येते. त्यातूनच ही बाब समोर आली आहे. दरम्यान, नव्या व्हेरिएंटच्या संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, मास्क वापरावा, अत्यावश्यक असल्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे त्याचप्रमाणे शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामानात बदल आणि काळजी
भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (IMD), नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला आहे, परंतु पुणे शहरासह राज्यातील अनेक भागांत अद्याप म्हणावा तसा पाऊस सुरू झालेला नाही. दिवसभरात तापमान आणि आर्द्रतेतील फरक जाणवू शकतो. मंगळवारी पुणे शहरात दिवसाचे तापमान 34.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सामान्यपेक्षा दोन अंश सेल्सिअसने ते जास्त आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, शहराच्या विविध भागात आर्द्रता 45% ते 47%च्या दरम्यान होती. दरम्यान, अशा ढगाळ वातावरणाचा शरीरावर परिणाम होत असून कमी प्रतिकारशक्ती असलेल्यांना विविध आजारांचे संक्रमण होण्याचा धोका आहे.