अखेर ज्याची भीती होती तेच घडतंय, पुण्यात शिंदे-ठाकरे गट आमनेसामने

| Updated on: Feb 18, 2023 | 5:00 PM

पुण्यात शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यामध्ये जोरदार राडा झाल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याने ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता अशा घडामोडी घडू लागल्या आहेत.

अखेर ज्याची भीती होती तेच घडतंय, पुण्यात शिंदे-ठाकरे गट आमनेसामने
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सारं काही आलबेल नाही, अशीच परिस्थिती आहे. कारण शिवसेना (Shiv Sena) दोन गटात विभागली गेलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) शिवसेनेचं नाव आणि चिन्ह बहाल करण्यात आल्याने ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याबद्दल अजून निकाल यायचा बाकी आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल जाहीर केलाय. या निकालानंतर ठाकरे गटात खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिंदे-ठाकरे गटाचा वाद हा गेल्या आठ महिन्यांपासून सुरु आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संयम पाळावं, असं वेळोवेळी त्यांच्या गटाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलंय. पण आता ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा संयम सुटताना दिसतोय. त्यातूनच पुण्यात दोन गटात मोठा राडा झाल्याची माहिती मिळत आहे.

यावेळी पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून परिस्थिती हाताळली गेली. सुरुवातीला वाद मिटवणं पोलिसांना शक्य होत नव्हतं. पण नंतर वाद निवळण्यात पोलिसांना यश आलं.

हे सुद्धा वाचा

दोन्ही गटाचे कार्यकर्ते एका विशेष कार्यक्रमासाठी पत्रकार संघाजवळ आले होते. कार्यक्रमाला दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती. संबंधित कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते बाहेर आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले. त्यांनीदेखील लगेच घोषणाबाजीला सुरुवात केली.

अखेर परिस्थिती हाताबाहेर जाते की काय, असं चित्र निर्माण झालं. वाद सुरु होताच सुदैवाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. हा वाद सहजासहज मिटत नव्हता. पण पोलिसांच्या मध्यस्थीने वाद निवळण्यात यश आलं. दरम्यान, शिंदे आणि ठाकरे गटातील वाद नवा नाही. असाच वाद काल दापोलीत देखील बघायला मिळाला होता.

उद्धव ठाकरे यांचं तडाखेबाज भाषण

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मुंबईत ‘मातोश्री’बाहेर जीपवर उभं राहून तडाखेबाज भाषण केलं. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते आज सकाळपासून मातोश्रीबाहेर आले होते. या कार्यकर्त्यांसोबत उद्धव ठाकरे यांनी काही वेळासाठी संवाद साधला होता. पण तरीही कार्यकर्ते तिथून जायला तयार नव्हते. अखेर दोन तासांनी उद्धव ठाकरे पुन्हा कलानगर चौकात आले. यावेळी त्यांनी तडाखेबाज भाषण केलं. त्यांच्या या भाषणामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा संचारलेली बघायला मिळाली.