पुण्यात बीआरटीवरुन वाद, महापौरांकडून उद्घाटनाची घोषणा, राष्ट्रवादीची भूमिका काय?
पुण्याच्या महापौरांनी स्वारगेट ते कात्रज हा बीआरटी मार्ग सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, यावरुनच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपलीय.

पुणे : पुण्याची लाईफलाईन म्हणून पीएमपीएलला ओळखलं जातं. हीच लाईफलाईन सूखकर व्हावी यासाठी 2007 साली पुण्यात बीआरटीचा प्रकल्प राबवण्यात आला. यातील आता स्वारगेट ते कात्रज हा मार्ग सुरु करण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. हा बीआरटी प्रकल्प काय आहे आणि या प्रकल्पाची नेमकी काय स्थिती आहे? या विषयीचा हा खास रिपोर्ट (Dispute in BJP and NCP over Pune BRT project inauguration).
स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्ग 1 जानेवारीपासून खूला होणार आहे. या बीआरटी प्रकल्पामुळे स्वारगेट ते कात्रज पुणेकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. काम पूर्ण होण्याआधीचं पालिकेने घाई सुरु केली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने आधी काम पूर्ण करा आणि मगच बीआरटी सुरू करा, अशी मागणी केली आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडी हा कळीचा मुद्दा बनलाय. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता हे पुण्यातील प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यातील आश्वासन आहे. याच वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी आणि पुणेकरांचा प्रवास जलद व्हावा यासाठी जलद वाहतूक सेवा म्हणजे बीआरटी प्रकल्पाची अहमदाबादच्या धर्तीवर पुण्यात निर्मिती करण्यात आली. मात्र, 14 वर्ष होऊनही हा प्रकल्प यशस्वी झाला नाही.
पहिला प्रकल्प बीआरटी मार्ग हा स्वारगेट ते हडपसर या मार्गावर राबवण्यात आला. मात्र, गेल्या 10 वर्षात तो यशस्वी झालेला नाही. आता याच प्रकल्पातील दूसरा मार्ग असलेल्या स्वारगेट ते कात्रज हा बीआरटी मार्ग सुरू करण्याची घोषणा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलीय.
पुणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्ती करणारा बीआरटी प्रकल्प नेमका काय?
अहमदाबाद शहराच्या धर्तीवर पुण्यात 2007 साली बीआरटीची सुरुवात करण्यात आली. जलद बस वाहतूक सेवा हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनःनिर्माण योजनेंतर्गत बीआरटी प्रकल्प सुरु झाला. 2007 ला प्रकल्प पुण्यात येऊनही 2020 पर्यंतही काम पूर्ण नाही. बीआरटी प्रकल्प फसला अशीच काही पुणेकरांची ओरड आहे. याच प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज हा बीआरटी मार्ग 1 जानेवारीला सुरु होतोय.
बीआरटी प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
महापौरांनी बीआरटी सुरू करण्याची घोषणा केली खरी मात्र, अजूनही बीआरटी मार्गावरील बस थांब्याचं काम अपूर्णचं आहे. येत्या 2 दिवसांमध्ये हे काम पूर्ण करू असं महापौर म्हणत आहेत. मात्र, गेल्या 4 वर्षात 100 कोटी रुपये एवढा निधी खर्च करूनही काम पूर्ण कसं नाही? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसनं विचारलाय. काम अपूर्ण असताना बीआरटी सुरु करण्याची घाई का? असा प्रश्न विचारतानाच राष्ट्रवादीने या प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप केलाय.
बीआरटी मार्गाचं सद्यस्थितीला तरी काम अपूर्णच पाहायला मिळतंय. बीआरटी मार्गातून खासगी वाहनं सर्रासपणे वाहतायेत आणि ज्या बसेससाठी ही बीआरटी तयार करण्यात आली त्या बसेस वाहतूक कोंडीतून मार्ग काढतायेत. आता पुढच्या काळात लवकर काम पूर्ण होऊन हा बीआरटी प्रकल्प यशस्वी होतो की पहिल्या स्वारगेट ते हडपसर या मार्गासारखाच फसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
पुणेकरांसाठी खुशखबर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएल बस सेवा सुरु होणार
पुणेकरांचा प्रवास सुसाट होणार, स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्ग 1 जानेवारीपासून खुला
पुणेकरांची चिंता वाढली, इंग्लडहून 542 प्रवासी पुण्यात, 109 सापडेनात, दोघे कोरोनाबाधित
Dispute in BJP and NCP over Pune BRT project inauguration