Pune : सेल्फीचा मोह बेतला भावाच्या जीवावर, बहिणी वाचल्या तो बुडाला, पुण्यातील पानशेत धरणावर काय घडलं?

| Updated on: Jan 21, 2024 | 9:16 PM

पुण्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. सेल्फी काढणं जीवावर बेतलं असून 18 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून झाला आहे. ही घटना पानशेत धरणाजवळील सांडव्यामध्ये घडली आहे. दोन बहिणी वाचल्या मात्र त्यांच्या भावाचा दुर्देवी मृत्यू झालाय.

Pune : सेल्फीचा मोह बेतला भावाच्या जीवावर, बहिणी वाचल्या तो बुडाला, पुण्यातील पानशेत धरणावर काय घडलं?
Panshet Dam
Follow us on

पुणे : पुण्यातील पानशेत धरणाच्या सांडव्यात उतरून सेल्फी काढताना बुडणाऱ्या बहिणांना वाचवताना भावाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. बुडणाऱ्या दोन बहिणींना स्थानिक युवकांनी जीवाची बाजी लावून वाचवलंय, मात्र यात ज्ञानेश्वर बालाजी मनाळे याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ज्ञानेश्वरच्या मृत्यूने पानशेत परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केलीय.

पानशेत धरणाच्या वेगाने वाहणाऱ्या सांडव्यातील पाण्यात उतरुन सेल्फी काढताना बुडणाऱ्या दोन बहिणींना वाचवताना सख्ख्या भावाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी (21) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. बुडणाऱ्या दोन बहिणींना स्थानिक युवकांनी जीवाची बाजी लावून जीवनदान दिले.

ज्ञानेश्वर बालाजी मनाळे (वय १८रा. खराडी, पुणे) असे मयत भावाचे नाव आहे. अनुसया बालाजी मनाळे आणि मयुरी बालाजी मनाळे अशी दोन बहिणींची नावे आहेत. स्थानिक युवक साईराज संतोष रायरीकर आणि करण बाबुराव चव्हाण आरडाओरडा ऐकून सांडव्यात उड्या मारत बुडणाऱ्या अनुसया आणि मयुरी यांना जीवाची बाजी लावून बाहेर काढले, त्यामुळे त्यांचे प्राण वाचलेत. घटनेची माहिती मिळताच पानशेत पोलिस चौकीचे पोलिस हवालदार पकंज मोघे, अंमलदार कांतीलाल कोळपे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सह्याद्री आपत्ती व्यवस्थापनचे पथक तसेच पुणे महानगर प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.

पाण्याच्या कडेला उभे राहून ते सेल्फी काढत होते. त्या वेळी अनुसया मनाळे ही पाय घसरून पाण्यात पडली तिला बाहेर काढण्यासाठी तिची बहीण मयुरी ही पाण्यात उतरली मात्र वेगाने वाहणाऱ्या पाण्यात दोघीजणी बुडू लागल्या त्यावेळी त्यांना वाचविण्यासाठी भाऊ ज्ञानेश्वरने अंगावरील कपड्यांसह पाण्यात उडी मारली. पाण्याचा अंदाज न आल्याने काही क्षणातच ज्ञानेश्वर बुडून बेपत्ता झाला. सुदैवाने यावेळी घटनास्थळी असलेल्या साईराज रायरीकर आणि करण चव्हाण स्थानिक युवकांनी पर्यटकांच्या मदतीने दोघींना सुखरूप पाण्याबाहेर काढले.

आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले चोंडे, संदीप सोलसकर आणि आबाजी जाधव तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी एकाच वेळी सांडव्यात उतरून दोन्ही बाजूला ज्ञानेश्वर याचा शोध सुरू केला. दोन तासांच्या शोध मोहीमे नंतर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापनचे कार्यकर्ते संदीप सोलकर याला सांडव्याच्या एका बाजूला खोल पाण्यात ज्ञानेश्वर चा मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढून तिरावर आणला. शव विच्छेदनासाठी मृतदेह पुण्यात रुग्णालयात नेण्यात आला.

सह्याद्री आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पुणे अग्निशमन दलाचच्या जवानांना दोन तासांच्या शोध मोहीमे नंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह शोधण्यात यश आलंय.