Corona new varient : कोरोनाचा नवा व्हेरिएंट जास्त संसर्गजन्य मात्र शरीरास फार घातक नाही, सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटेंची पुण्यात माहिती
पुण्यात ओमायक्रॉनचे 2 नवे सब व्हेरिएंट BA4चे चार आणि BA5चे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यात 4 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश आहे. त्यातील चार रुग्ण हे 50पेक्षा जास्त वय असलेले, 2 रुग्ण 20 ते 40 मधील, तर एक रुग्ण हा 10 वर्षाखालील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती.

पुणे : कोरोनाची (Corona) लागण झालेल्या पुण्यातील रुग्णांमध्ये कोरोनाचे नवे व्हेरिएंट आढळले आहेत. एकूण सात जणांना या नव्या व्हेरिएंटची लागण झाली असून रुग्णांमध्ये एका 9 वर्षीय मुलाचादेखील समावेश असल्याची माहिती राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे (Dr. Pradeep Awate) यांनी दिली आहे. त्यांनी पुण्यात ही माहिती दिली. मात्र असे जरी असले तरी या नव्या व्हेरिएंटचा शरीरावर फार घातक परिणाम नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र काळजी घ्यावी, असेदेखील आवटे यांनी सांगितले आहे. दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरिएंट BA4 आणि BA5चे 7 रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य खाते खडबडून जागे झाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे नवे व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य (Contagious) असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
अजित पवारांनीही व्यक्त केली चिंता
राज्यात विशेषत: पुण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून जनतेला याविषयी सांगितले जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केले. आरोग्य विभागाला या नव्या व्हेरिएंटबद्दल चौकशी करायला सांगितले आहे. मंत्री राजेश टोपे यांच्याशीही उद्या मुंबईत चर्चा करून जनतेला काय काळजी घ्यावी, याविषयी सांगितले जाईल, असे अजित पवार सकाळी म्हणाले होते.



कोरोनाची काय परिस्थिती?
पुण्यात ओमायक्रॉनचे 2 नवे सब व्हेरिएंट BA4चे चार आणि BA5चे तीन रुग्ण आढळले आहेत. त्यात 4 पुरूष आणि 3 महिलांचा समावेश आहे. त्यातील चार रुग्ण हे 50पेक्षा जास्त वय असलेले, 2 रुग्ण 20 ते 40 मधील, तर एक रुग्ण हा 10 वर्षाखालील असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती. ओमायक्रॉनच्या BA 2 या व्हेरिएंटप्रमाणेच BA4 आणि BA5 व्हेरिएंटची लक्षणे आहेत. या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण तामिळनाडू तर दुसरा रुग्ण तेलंगाणात आढळला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील पुण्यात 7 रुग्ण आढळून आले आहेत.