Covid : चौथी लाट आलीच तर ती सौम्य असेल, मात्र मास्क आणि बुस्टर डोस आवश्यकच! पुण्यातल्या डॉक्टरांनी काय सांगितलं? वाचा…
सरकारने जरी सक्ती केली नसली तरी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. अनेकांनी दोन डोस पूर्ण केले आहेत. मात्र बुस्टर डोस अनेकजणांनी घेतलेला नाही. तर तो घेणे आवश्यक आहे, असे डॉ. मुकुंद पेनुरकर यांनी सांगितले आहे.
पुणे : सध्या राज्यात कोरोनाचे (Covid) रुग्ण नक्कीच वाढत आहेत, मात्र लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. जर राज्यात चौथी लाट आलीच तर ती खूप सौम्य असेल, असे मत डॉ. मुकुंद पेनुरकर (Dr. Mukund Penurkar) यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात बोलत होते. राज्यातील कोरोना पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी माहिती दिली आहे. मुंबई-पुण्यासह कोरोना रुग्णांची रुग्ण संख्या जी शंभरीच्या आसपास होती, तीच रुग्णसंख्या मागच्या चार दिवसांपासून 1 हजारच्या वर गेली आहे. कालदेखील राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. मंगळवारी राज्यात तब्बल 1 हजार 881 रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत 1242 रुग्णांची नोंद झाली आहे. आता याच पार्श्भूमीवर राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ही लाट सौम्य (Mild) असेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
‘घरीच घेऊ शकतात उपचार’
सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण मागील एक-दोन महिन्यात खूप कमी झाले होते. मात्र आता त्यात वाढ झाली आहे. त्यातील बऱ्याचजणांना कोरोनाची लागण झाल्याचेही दिसून येत आहे. अनेकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. मात्र जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही. आपण तिसऱ्या लाटेमध्ये पाहिले, की रूग्ण सौम्य स्वरुपाच्या लक्षणांमधील आढळून येत आहेत. लक्षणांचा कालावधीही कमी आहे. अनेकांना रुग्णालयात येण्याची गरज नाही, घरच्या घरीदेखील उपचार घेता येवू शकतात, असे डॉ. पेनुरकर म्हणाले.
‘स्वत:चे संरक्षण करा’
सरकारने जरी सक्ती केली नसली तरी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. कारण ही एकच गोष्ट आपले अधिक संरक्षण करू शकते. सवय राहण्यासाठी आणि सरंक्षण अशा दोन्ही कारणांसाठी मास्क शक्य तितका वापरावा. त्याचबरोबर अनेकांनी दोन डोस पूर्ण केले आहेत. मात्र बुस्टर डोस अनेकजणांनी घेतलेला नाही. तर तो घेणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेमधील ओमिक्रॉन हा सौम्य होता. आता चौथी लाट आली तरी ती सौम्यच असेल, तिसऱ्या लाटेएवढी नसेल. रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण तसेच गंभीर होण्याचे प्रमाणही कमी असेल, असे डॉ. पेनुरकर यांनी सांगितले आहे.
नवा व्हेरिएंट?
राज्यात काल कोरोनाचा नवाच व्हेरिएंट आढळला. त्यामुळे काळजी वाढली आहे. तर मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडाही सतत वाढत आहे. बी. ए 5 या नव्या व्हेरिएंटची पुण्यातील महिलेला लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या 31 वर्षीय महिलेवर घरीच उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यात काल 1881 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे 24 तासांतच रुग्णसंख्या 2 हजाराजवळ गेली.