Pune Balgandharva : ‘विकास करा पण पाडून नको’; पुण्यातलं बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याला नाट्यकर्मी अन् निर्मात्यांचा विरोध
बालगंधर्व रंगमंदिर या वास्तूशी पुणेकरांचे भावनिक नाते आहे. कालानुरूप या वास्तूचा पुनर्विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर रंगकर्मींच्या मते ते न पाडता विकास करण्याची मागणी होत आहे.
पुणे : पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या (Balgandharva rangmandir) पुनर्विकास मॉडेलला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिर पाडले जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र बालगंधर्व रंगमंदिर पाडू नका, अशी मागणी नाट्यकर्मी आणि निर्मात्यांनी केली आहे. महापालिकेचीच (PMC) तीन नाट्यगृहे ही बंद पडायच्या अवस्थेत आली आहेत. बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याच्या अवस्थेसारखे नाही. त्यामुळे विकास करायचाच असेल तर बाजूला करा मात्र बालगंधर्व पाडू नका. याला आमचा विरोध असेल, अशी भूमिका नाट्यकर्मी आणि निर्मात्यांनी घेतली आहे. मागील अनेक वर्षांपासून बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास (Redevelopment) आणि त्याविषयीच्या चर्चा होत होत्या. बालगंधर्व रंगमंदिर या वास्तूशी पुणेकरांचे भावनिक नाते आहे. कालानुरूप या वास्तूचा पुनर्विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर रंगकर्मींच्या मते ते न पाडता विकास करण्याची मागणी होत आहे.
आधीही झाला होता विरोध
सांस्कृतिक चळवळीच्या अंतर्गत आधीही महापालिकेने पुनर्विकास करण्याचे ठरवले होते. मात्र नाट्यकर्मींचा याला विरोध आधीही होता. आत्ताही आहेच. हा सांस्कृतिक ठेवा आहे. 1965ला ही वास्तू उभी राहिली. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन झाले. अनेक दिग्गजांनी येथे नाटके केली आहेत. त्यामुळे पुणेकरांची नाळ याच्याशी जोडली गेली आहे. त्यामुळे पुनर्विकासास विरोध होत आहे.
सामान्य नागरिकांचे काय मत?
बालगंधर्व रंगमंदिर काळाप्रमाणे बदलले पाहिजे. एकाच ठिकाणी मल्टिप्लेक्स स्वरूपात नाट्यगृह तयार व्हावे. यामध्ये नाटकाशी संबंधित विविध दालने असायला हवीत, असे काहींचे म्हणणे आहे. तर काहींच्या मते भौतिक सुविधा, जसे पाणी, छत, एसी, आवाजाची अद्ययावत यंत्रणा आदी सुविधा मिळायला हव्यात, अशी अपेक्षा आहे. नाट्यकर्मींच्या मते सर्व सुविधा दिल्या जाव्यात, बाजूचा विकास करावा, मात्र हा ठेवा पाडू नये, अशी मागणी होत आहे.