Pune dams : पुणेकरांनो, वर्षभराची पाण्याची चिंता मिटली! धरण परिसरातल्या पावसामुळे पाणीसाठा वाढला..!
जलाशयांमध्ये पावसाच्या पाण्याची आवक सुरूच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी चार धरणांत 1.3 टीएमसी पाणीसाठा झाला, तर सायंकाळपर्यंत आणखी 0.5 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
पुणे : खडकवासला (Khadakwasla dam) सर्कलमधील चार धरणांमधील एकत्रित साठा शुक्रवारी 16 टीएमसीपर्यंत वाढला आहे. त्यामुळे शहराची वर्षभराची गरज भागण्याइतरा साठा जुलैच्या मध्यापर्यंत झाला आहे. पुणे महानगरपालिका (PMC) खडकवासला धरणातून दर महिन्याला सुमारे 1.25-1.5 टीएमसी पाणी घेते. त्याची वार्षिक सरासरी 16-18 टीएमसीपर्यंत जाते. राज्य पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणांमध्ये 29.15 टीएमसी एवढी सामूहिक साठवण क्षमता असून सध्या ते 54.7% भरलेली आहेत. खडकवासला येथील जलसाठा शुक्रवारी 1.97 टीएमसी (साठवण क्षमतेच्या 100%) इतका होता, तर पानशेत आणि वरसगाव येथील जलसाठा त्यांच्या संबंधित क्षमतेच्या 55% आणि 51% इतका वाढला. टेमघरचा साठा 1.5 टीएमसी असून 3.7 टीएमसीच्या एकूण साठवण क्षमतेच्या 40%पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, सध्यातरी धरणक्षेत्रास पाऊस (Rain) कमी झाला आहे.
पावसाच्या पाण्याची आवक
जलाशयांमध्ये पावसाच्या पाण्याची आवक सुरूच असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी चार धरणांत 1.3 टीएमसी पाणीसाठा झाला, तर सायंकाळपर्यंत आणखी 0.5 टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. शुक्रवारी पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाचा जोर कमी झाला. शुक्रवारी सायंकाळपर्यंत खडकवासला येथे 6 मिमी, पानशेत आणि वरसगाव येथे प्रत्येकी 30 मिमी आणि टेमघरमध्ये 40 मिमी पावसाची नोंद झाली.
मुठा नदीत पाणी सोडण्याचे काम सुरूच
पाटबंधारे विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले, की खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असला तरी जलाशयातून मुठा नदीत पाणी सोडण्याचे काम सुरूच आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी कमी झाल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला जाईल. धरणातील पाणीसाठा जवळपास 90 टक्के राखला जाणार आहे. शुक्रवारी खडकवासला वगळता भीमा खोऱ्यातील आणखी सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. वीर धरणातील पाण्याचा साठा क्षमतेच्या 80% पेक्षा जास्त वाढल्यानंतर वीर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला.
जूनमध्ये 10 टक्क्यांच्या खाली गेला होता पाणीसाठा
पाटबंधारे विभागाच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले, की शहराच्या पूर्वेकडील भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या भामा आसखेडमध्ये शुक्रवारी 5.70 टीएमसी (74%) पाणीसाठा होता, तर पिंपरी चिंचवड हद्दीत पाणीपुरवठा करणाऱ्या पवना येथे 4.7 टीएमसी (55%) पाणीसाठा होता. पाणलोट क्षेत्रात अल्प पाऊस झाल्याने जूनच्या शेवटच्या आठवड्यात खडकवासला वर्तुळातील चार धरणांमधील एकत्रित पाणीसाठा 10 टक्क्यांच्या खाली गेला होता.