दोन वर्षाचा चिमुरडा खेळताना स्विमिंग टँकमध्ये पडला, मुलाला वाचवायला वडिलांनी उडी घेतली पण…
वडील कृषी पर्यटन केंद्रात काम करत होते. दोन वर्षाचा चिमुरडा खेळता खेळता स्विमिंग पूलजवळ गेला. यावेळी त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. वडिलांनी ही बाब पाहिली अन् पोहता येत नसतानाही काळजाच्या तुकड्याला वाचवण्यासाठी निष्फळ प्रयत्न केले.
सुनील थिगळे, शिरूर/पुणे : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील जांबुत येथे कृषी पर्यटन केंद्रात बनवण्यात आलेल्या स्विमिंग टॅंकमध्ये बुडून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. सत्यवान गाजरे असे मयत पित्याचे नाव आहे. या घटनेमुळे गाजरे कुटुंबावरती शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लहान मुलगा खेळता खेळता स्विमिंग टँकमध्ये पाय घसरून पडला. त्याला वाचवण्यासाठी वडील सत्यवान गाजरे गेले असता ते ही स्विमींग टँकमध्ये बुडाले. पिता-पुत्राचा आपल्याच कृषी पर्यटन केंद्रात स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
गाजरे यांच्याच मालकीचे आहे कृषी पर्यटन केंद्र
सत्यवान गाजरे यांचे जांबुत येथे चारंगबाबा कृषी पर्यटन केंद्र आहे. या पर्यटक केंद्राच्या बाजूलाच ते कुटुंबासोबत राहतात. दुपारच्या सुमारास सत्यवान हे काम करत असताना त्यांचा 2 वर्षाचा मुलगा खेळता खेळता स्विमिंग टँकजवळ गेला. यावेळी त्याचा पाय घसरून तो स्विमिंग टँकमध्ये पडला. हे त्याचे वडील सत्यवान यांनी पाहिले आणि ते मुलाला वाचवायला गेले. मात्र त्यांनाही पाण्यात पोहता येत नव्हते.
पोहता येत नसल्याने पिता-पुत्राचा मृत्यू
हा सर्व प्रकार पाहून सत्यवान यांची पत्नी स्नेहल हिने आरडाओरडा करत तिनेही पती आणि मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र तिलाही पोहता येत नव्हते. पण तिने आरडाओरडा केल्यानंतर बाजूला असलेल्या नागरिकांनी धाव घेत स्नेहलला वाचविण्यात यश आले. मात्र दोन वर्षाचा मुलगा आणि त्याचे वडील सत्यवान यांना वेळीच मदत मिळाली नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गाजरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.