Pune firing incident : पुण्यातल्या नारायणगावात गोळीबार अन् चाकूहल्ला; चौदा जणांवर गुन्हा दाखल, पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या
आरोपी मंगळवारी रात्री नारायणगाव येथील हॉटेल कपिल बिअर बारमध्ये दोन वेगवेगळ्या टेबलवर जेवणासाठी बसले होते. रात्री अकराच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून दोन गटातील तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
नारायणगाव, पुणे : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथील कपिल बिअर बारमध्ये गोळीबार (Firing in Kapil Bar) झाल्याचा प्रकार घडला. नारायणगावातील सात जणांनी दहशत निर्माण करण्यासाठी बेकायदा जमाव जमवत हा गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे. मन्या पाटे आणि गणपत गाडेकर यांच्यासह पाच जणांनी गोळीबार करून पाच जणांवर चाकू हल्ला (Knife attack) केला आहे. यात ते जखमी झाले आहेत. दरम्यान गोळीबार आणि चाकूहल्ला करून आरोपी फरार झाले आहेत. नारायणगाव पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. तर याप्रकरणी नारायणगाव पोलिसांत (Narayangaon police) चार अल्पवयीन मुलांसह चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोन जणांना अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (ता. 10) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
इतर आरोपी फरार
या प्रकरणी एका गटातील मन्या पाटे, गणपत गाडेकर (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांच्यासह इतर चार ते पाच अज्ञात साथीदार व दुसऱ्या गटातील आकाश ऊर्फ बाबू कोळी (रा. घोडेगाव, ता. आंबेगाव) यांच्यासह चार अल्पवयीन मुले व त्यांचे अज्ञात दोन साथीदार यांच्यावर दहशत निर्माण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी मन्या पाटे व आकाश कोळी यांना अटक केली असून इतर आरोपी फरारी आहेत.
घटना काय?
आरोपी मंगळवारी रात्री नारायणगाव येथील हॉटेल कपिल बिअर बारमध्ये दोन वेगवेगळ्या टेबलवर जेवणासाठी बसले होते. रात्री अकराच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून दोन गटातील तरुणांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी मन्या पाटे, गणपत गाडेकर व त्यांच्या इतर चार ते पाच साथीदारांनी धारदार चाकूने आकाश कोळी व त्याच्या साथीदारांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आकाश कोळी याच्या साथीदारांनी पिस्तुलातून मन्या पाटे याच्या दिशेने एक राउंड फायर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी पसार झाले. या प्रकरणी फौजदार सनील धनवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायणगाव पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हा दाखल केला.