हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा : सिंधुताई सपकाळ
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी या पुरस्कारावर आपली भावना व्यक्त केलीय.
पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. यात 6 महाराष्ट्राच्या व्यक्तींचाही समावेश आहे. त्यापैकी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी या पुरस्कारावर आपली भावना व्यक्त केलीय. तसेच हा पुरस्कार मला सहकार्य करणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी नागरिकांना त्यांच्या अनाथ मुलांचे गणोगत होण्याचंही आवाहन केलं (First comment of Social activist Sindhutai Sapkal over getting Padma Award).
सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, “आज माझ्या आयुष्यावर कळस चढला असं मला वाटतं. माझ्या लेकरांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. ते फार उड्या मारायला लागलेत. पण भूतकाळ विसरता येत नाही. भूतकाळाला पाठिशी बांधून वर्तमानाचा शोध घेतेय म्हणून इथपर्यंत आले. तुम्ही सर्वांना साथ दिली, मदत केली, वेळोवेळी मायेवर चार शब्द लिहिले म्हणून माई जगाला कळली.”
“हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा”
“माझी प्रेरणा, माझी भूक ही पोटाची, भाकरीची. मी भाकरीला धन्यवाद देतो कारण भाकरीच मिळत नव्हती. माझ्या लेकरांना भाकरी मिळावी म्हणून रानोरान फिरले. लोकांनी मला सहकार्य केलं. त्यावेळी देणाऱ्यांचे, त्या काळात ज्यांनी माझी झोळी भरली त्यांचे आणि मला जगण्याचं बळ दिलं त्या माझ्या लेकरांचा या पुरस्कारावर अधिकार आहे, उरलासुरला माझा,” अशीही भावना सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.
‘उसवलेलं आयुष्य आज शिवलं गेलं, शिक्कामोर्तब झालं’
सिंधुताई सपकाळ म्हणाल्या, “आज माझ्या आयुष्याला टाके घातले. कारण उसवलेलं आयुष्य आज शिवलं गेलं. शिक्कामोर्तब झालं. माझे लेकरंही आनंदात आहेत. माझ्या आनंदात तुम्ही सर्वजण सहभागी झालात. त्यामुळे जगा, पुढे जा, पण मागे वळून पाहा. माई जगली, आता तुम्ही सर्वांनी माईकडे नजर ठेवा. माईसाठी जगा, माईसाठी थोडा वेळ द्या. मी माझ्या अनाथांची माय झाले. तुम्ही सर्वांनी गणोगत व्हा, एवढीच विनंती करते. हा पुरस्कार तुम्हा सर्वांच्या कष्टाला अर्पण करते, माझ्या लेकरांना अर्पण करते.”
हेही वाचा :
Padma Awards: संगीताचा जादुगार एस. पी. बालासुब्रमण्यम यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार
Padma Award : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा, पाहा संपूर्ण यादी
Padma Awards | पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींचा पद्म पुरस्काराने सन्मान
व्हिडीओ पाहा :
First comment of Social activist Sindhutai Sapkal over getting Padma Award