पुणे : पार्किंगच्या वादातून (Parking dispute) एकाला बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात 26 जून रोजी ही घटना घडली. वाहनांच्या पार्किंगवरून झालेल्या वादातून एका 33 वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली. यात संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. नरेंद्र खैरे (33, रा. आंबेगाव बुद्रुक) असे पीडित तरुणाचे नाव असून तो एका खासगी कंपनीत कामाला होता. तो निवृत्त पोलीस महानिरीक्षक (Inspector General of Police) रघुनाथ खैरे यांचा मुलगा होता. त्यांनी पुणे शहरात उपायुक्त म्हणूनही काम केले होते, असे पोलिसांनी सांगितले. क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीला पोटावर सपासप वार करून संपविण्यात आले आहे. या घटनेत हत्या (Murder) झालेली व्यक्ती आणि आरोपी एकमेकांना ओळखत असावेत, असे स्थानिकांच्या बोलण्यातून जाणवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव बुद्रुक येथे 27 जूनच्या पहाटे नरेंद्रचा एका रेस्टॉरंटजवळील पार्किंगच्या जागेत मृतदेह आढळला. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की परिसरातील सुरक्षा कॅमेरा फुटेज आणि काही स्थानिक लोकांकडे याबाबत चौकशी करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांना धागेदोरे मिळाले. काही लोकांशी संबंधित व्यक्तीचा वाद झाला. या वादानंतर त्याच्या पोटात अनेक वार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
मृत व्यक्तीशी पूर्वीपासून ओळख असलेल्या संशयितांनी 26 जून रोजी सायंकाळी आंबेगाव बुद्रुक येथील एका रेस्टॉरंटजवळील पार्किंगमध्ये त्याच्याशी वाद घातला होता. तर त्याच्या पोटात अनेक वार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आतडे पूर्णपणे फाटलेल्या अवस्थेत पाहायला मिळाले होते. पोटावर सपासप वार करून घटनास्थळावरून संशयित पळून गेले होते. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक नागरिकांकडे या प्रकरणाचा कसून तपास केला. त्यानंतर आता याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आल्याचे पुणे पोलिसांच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.