Pune Loudspeakers : परवानगी असेल तर भोंगे काढण्याचा प्रश्नच नाही, मात्र आवाजाची मर्यादा पाळू; मुस्लीम संघटनेच्या पुण्यातल्या बैठकीत निर्णय
भोंगे (Loudspeaker) न उतरवता आवाजाची मर्यादा पाळू, असा निर्णय मुस्लीम संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अवामी महाज संघटनेच्या वतीने पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये (Azam campus) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आझम कॅम्पसचे पी. ए. इनामदार (P. A. Inamdar) उपस्थित होते.
पुणे : भोंगे (Loudspeaker) न उतरवता आवाजाची मर्यादा पाळू, असा निर्णय मुस्लीम संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. अवामी महाज संघटनेच्या वतीने पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये (Azam campus) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अवामी महाज संघटनेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार (P. A. Inamdar) उपस्थित होते. ते म्हणाले, की पुणे शहरात 450 मस्जिदी आहेत. दिवसातून 5 वेळा नमाज अदा केली जाते. प्रत्येक अजानचा 1 ते 1:30 मिनिटे वेळ असतो. रात्री 10च्या पुढे आवाज करता येत नाही. सकाळी 6 आणि रात्री 10च्या मध्ये तुम्हाला अजान लाउडस्पीकरवर करता येते. ज्यांच्याकडे परवानगी नाही, त्यासंबंधी आम्ही परवानगी घेऊ. परवानगी असेल तर भोंगे काढण्याची गरज नाही. आवाजाची मर्यादा पाळू, अन्याय झाला तरी संयम पाळण्याच्या सूचना आम्ही दिल्यात, असे ते यावेळी म्हणाले.
‘कायदा अंमलात आणावा’
या बैठकीस मुस्लीम समाजाच्या संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी पी. ए, इनामदार म्हणाले, की पुणे शहरातील विश्वस्ताना ही माहिती मिळावी, यासाठी ही बैठक होती. याचा हेतू वेगळा काहीही नाही. कायदा अंमलात आणला पाहिजे. मंदिरातदेखील माइक लावायचा असेल तर परवानगी घ्यावी लागते. 400 ते 450 मस्जिदचे अर्ज करण्याचे फॉर्म आम्ही पाठवून दिले आहेत. आलेल्या लोकांना पण आम्ही फॉर्म देणार आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयात अडचणी आल्या तर आम्ही मार्गदर्शन करू.
‘निवडणुका जवळ आल्या म्हणून…’
पुढे ते म्हणाले, की निवडणुका जवळ आल्या म्हणून या गोष्टी होते आहेत. मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. मंदिरातील विश्वस्तांनीही यात सहभागी व्हावे. शांतता नांदली पाहिजे. वितुष्ट असता कामा नये, म्हणून ही बैठक होती. कायदेशीर जी तरतूद आहे तो निर्णय आम्ही घेऊ. अल्टीमेटम महत्त्वाचा नाही, कायदा महत्त्वाचा आहे. नियम आहेत तर नियम पाळले पाहिजेत. वातावरण खराब होईल, असे काहीही करू नका. वादासारखे असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आम्ही पुण्यात कोणताही अनूचित प्रकार घडू देणार नाहीत, असे यावेळी सांगण्यात आले.