Pune crime : तुमच्यावर वाईट शक्तींचा प्रभाव आहे, असं म्हणत श्रद्धाळू महिलेची भविष्य सांगणाऱ्या भोंदूनं केली फसवणूक; जेजुरीत गुन्हा दाखल
या महिलेची एकूण चार लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तिला असेही आढळले, की त्या व्यक्तीने त्याच पद्धतीचा वापर करून तिच्या भावाकडून 19 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेतले आहेत.
पुणे : भविष्यात तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वाईट शक्तींचा तुमच्यावर प्रभाव पडला आहे. तो दूर करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक (Duped) करण्यात आली आहे. पुण्याच्या जेजुरीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील महिलेची (वय 43) तब्बल चार लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर स्वयंघोषित भविष्य सांगणाऱ्या भोंदूबाबाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल (Filed a crime) केला आहे. महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्याने सांगितले, की माझा मुलगा अपघातात सापडेल आणि त्याचे शिक्षण तो पूर्ण करू शकणार नाही. तर माझ्या मुलीला आणि पतीला ‘दुष्ट आत्म्यांच्या’ प्रभावामुळे भविष्यात आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागेल. दरम्यान, ग्रामीण पोलीस (Pune rural police) यासंबंधी अधिक तपास करीत आहेत.
पैसे परत करण्याचे आश्वासन दिले, पण…
महिलेच्या आईने पुरुषाचा संदर्भ दिल्याने तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने दिले, असे पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ते पुढे म्हणाले, की त्या माणसाने त्या महिलेला सांगितले होते, की तिला दुष्ट आत्म्यांपासून दूर ठेवण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. त्याने तिला 90 दिवसांनी पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांनी महिलेच्या घरी पूजा केली होती. तीन महिन्यांत सर्व काही परत करण्याचे आश्वासन देऊन त्याने अडीच लाख रुपये आणि 1.82 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेतले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
पूजांवर पूजा
गेल्या वर्षी मे महिन्यात तो माणूस पुन्हा महिलेच्या घरी गेला आणि दुसरी पूजा करण्याच्या बहाण्याने 76 हजार रुपये घेतले. यासह महिलेने त्याला एकूण 2.58 लाख रुपये रोख दिले. जेव्हा महिलेने त्याच्याकडे पैसे आणि सोन्याचे दागिने परत मागायला सुरुवात केली, तेव्हा त्या व्यक्तीने तिला पुन्हा भीती दाखवली, की तिच्या मुलीला आणखी समस्यांना सामोरे जावे लागेल आणि त्याला आणखी काही विधी करण्याची गरज आहे. त्याने तिला 39,000 रुपये देण्यास सांगितले जेणेकरून तो तिची रोकड आणि दागिने परत करू शकेल. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने त्याला आणखी 39,000 रुपये दिले, असे अधिकारी म्हणाला.
महिलेच्या भावाकडूनही उकळले पैसे
तीन महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर महिलेने तिच्या पैशासाठी त्या व्यक्तीकडे मागणी केली. त्याने आधी तिला 39,000 रुपये परत केले आणि नंतर आणखी 1 लाख रुपये ट्रान्सफर केले. तर या महिलेची एकूण चार लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तिला असेही आढळले, की त्या व्यक्तीने त्याच पद्धतीचा वापर करून तिच्या भावाकडून 19 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेतले आहेत.
विविध कलमांखाली गुन्हा दाखल
या व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 420 (फसवणूक) आणि 406 (विश्वासाचा भंग) आणि महाराष्ट्र प्रतिबंध आणि मानवी बलिदान निर्मूलन आणि इतर अमानवी, वाईट आणि अघोरी प्रथा आणि काळ्या जादूच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.