Pune : भेसळयुक्त पनीरसह तब्बल सव्वा चार लाखांचे दुधाचे पदार्थ जप्त, मांजरीत अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
सध्या गणेशोत्सव सुरू आहे. अशा दूध आणि दुधाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने स्वच्छतेचे तसेच इतर कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे.
पुणे : भेसळयुक्त पनीर (Paneer) करण्याच्या कारखान्यावर छापा टाकून नकली पनीर जप्त करण्यात आले आहे. अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द (Manjari Khurd) येथील मे. आर. एस. डेअरी फार्म या विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारून ही कारवाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर पनीरचा साठा यावेळी जप्त करण्यात आला. या कारखान्यावर छापा टाकून 1 लाख 97 हजार 780 रुपये किंमतीचे 899 किलो नकली पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरण्यात येणारी 2 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीची 549 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 4 हजार 544 रुपये किंमतीचे 28.4 किलो आरबीडी पामोलीन तेल असा एकूण 4 लाख 21 हजार 924 रुपये किंमतीचा साठा अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाने (Food and Drug Administration) जप्त करण्यात आला आहे.
प्रयोगशाळेकडे पाठविले नमुने
पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात असून घेण्यात आलेले नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. अशा दूध आणि दुधाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने स्वच्छतेचे तसेच इतर कोणतेही नियम पाळले जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी अशाप्रकारचे भेसळयुक्त पदार्थ सापडण्याची शक्यता आहे. अनेक मिठाईच्या दुकानांमधील पॅकवर एक्स्पायरी डेटही दिलेली नसते. त्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकले जात आहेत.
नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार
सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करून कमी दर्जाचे अन्न पदार्थ विक्री होण्याचे प्रकार वाढले आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. अशा प्रकारची बाब निदर्शनास आल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रशासनाचे पुणे विभागाचे सह आयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे. नागरिकांनी जागरूक होत अशा बाबी निदर्शनास आणल्या तरच याला आळा घातला येणार असल्याचे ते म्हणाले.