पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाचा वाद काही थांबायला तयार नाही. आता शरद पवार यांच्या कृतीने बाप्पा भक्त दुखावले आहेत. पूर्वनियोजित मंदिर दर्शन ठरलेले असताना पवारांनी मांसाहार का टाळला नाही, असा सवाल पुणेकर गणेशभक्तांनी विचारला आहे. काल शरद पवार यांनी दगडूशेठ मंदिराच्या (Dagdusheth Ganpati) आतमध्ये जाऊन दर्शन घेणे टाळले होते. त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतले होते. तर शरद पवार यांनी मांसाहार (Non-veg) केल्याने आतमध्ये जाऊन दर्शन न घेता बाहेरून केल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले होते. आता या मुखदर्शनानंतर गणेशभक्तांमध्ये मात्र नाराजी आहे. 30 वर्षांत पवार मंदिरात गेलेले नाहीत, या पार्श्वभूमीवर पवारांच्या कृतीने अपेक्षाभंग झाल्याचे पुणेकर गणेशभक्तांचे म्हणणे आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार नास्तिक असल्याचा थेट आरोप केला हाता. मात्र त्यानंतर शरद पवारांचे देवासमोरचे अनेक फोटो व्हायरल झाले. त्यानंतर शरद पवार काल पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जाणार होते. ते तिथे पोहोचलेही मात्र त्यांनी यावेळी मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घेतले. तर मी आणि पवार साहेबांनी नॉनव्हेज खाल्ले म्हणून ते मंदिरात गेले नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली होती. त्यानंतर पुन्हा पवारांच्या अस्तिक-नास्तिकतेचा संभ्रम कायम राहिला आहे. कारण पुण्यात मासाहाराचे कारण देत शरद पवारांनी दगडूशेठ मंदिरात जाणे टाळले, असा सवाल आता राजकारणात चर्चेत आहे. तर पुणेकरही नाराज आहेत.
शरद पवारांनी गणपतीचे दर्शन घेतले याचा आम्हाला आनंद आहे. राज ठाकरेंनी जे आरोप केलेले होते त्याला पवारांनी कृतीतून उत्तर दिले आहे. नॉनव्हेज खाल्ल्यामुळे पवार मंदिरात गेले नाहीत, ही भाविकतेची सर्वोच्च पायरी आहे. त्यामुळे शरद पवारांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो, शरद पवारांनी या आधीही सांगितलेले होते की मी प्रचाराच्या वेळी मंदिरात जातो पण आज पवारांनी दर्शन घेतले त्याचा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी दिली.
शरद पवारांना हिंदुच्या बाबतीत आकस आहे, ते नास्तिक आहेत, अशी टीका भाजपाने केली तर मंदिरात नाही गेले तर म्हणतात नास्तिक आहेत आणि आता गेले तरी अडचण, मात्र बाहेरून नमस्कार करायला अडचण काय, असा सवाल अजित पवारांनी केला होता.