हर्षवर्धन पाटील यांच्या फेसबुकवर छोटा बदल, मोठे संकेत; राजकीय भूमिका ठरली?
Harshvardhan Patil Facebook Change : माजी मंत्री, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे नवी राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. इंदापूरच्या तशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. आता त्यांच्या सोशल मीडियावर देखील एक बदल पाहायला मिळतोय. वाचा याबाबतची सविस्तर बातमी...
विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींनी वेग घेतला आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकारणातही मोठे बदल होत आहेत. इंदापूरमध्ये यंदा कोण आमदार होणार? याची जोरदार चर्चा रंगली आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. अशातच हर्षवर्धन पाटील यांच्या फेसबुक अकाऊंटवर एक बदल दिसतो आहे. या बदलामुळे हर्षवर्धन पाटील यांची राजकीय भूमिका ठरली असल्याचं बोललं जात आहे.
हर्षवर्धन पाटील फेसबुकवर पोस्ट करत असताना भाजपचं कमळ चिन्ह असणारं पोस्टर शेअर करत होते. माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघा अध्यक्ष असल्याचाही उल्लेख करत होते. यासोबतच कमळ चिन्हही ते वापरत होते. मात्र आता त्यांनी त्यांच्या फेसबुकवरील पोस्टमध्ये बदल केला आहे. आता माजी मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघा अध्यक्ष असल्याचा उल्लेख ते करत आहेत. मात्र कमळाचं चिन्ह त्यांच्या सध्याच्या पोस्टमध्ये दिसत नाही.
आधीची पोस्ट
आताची पोस्ट
हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. ते लवकरच तुतारी हाती घेतील, असंही बोललं जात आहे. मात्र इंदापूरमधील राष्ट्रवादी शरद पवार गटातील स्थानिक कार्यकर्त्यांचा मात्र याला विरोध आहे. इंदापूरमधील कार्यकर्त्यांनी बारामतील ‘गोविंद’बागेत जात काल शरद पवार यांची भेट घेतली. जे लोक कठीण काळात पक्षासोबत होते, त्यांना उमेदवारी द्या, अशी विनंती या कार्यकर्त्यांशी शरद पवारांना केली. स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतला जाईल. ज्याच्याकडे निवडून येण्याची क्षमता असेल, त्याला उमेदवारी दिली जाईल, असं शरद पवारांनी या कार्यकर्त्यांना सांगितलं.
इंदापूरची राजकीय परिस्थिती काय?
आघाडी सरकराच्या काळात मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील यांनी 2019 ला काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. मागच्या वर्षी राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत सामील झाला. त्यानंतर इंदापूरची राजकीय समिकरणं बदलली. दत्तात्रय भरणे हे देखील अजित पवारांसोबत गेले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महायुती कुणाला उमेदवारी देणार? याची चर्चा सुरु आहे. विद्यमान आमदार असणाऱ्या भरणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात येण्याची शक्यता आहे. आगामी काळात हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल.