पुणे : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादच्या खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यांच्या या कृतीने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत असून या प्रकाराने हिंदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना औरंजेबाचं दर्शन घेणं भोवणार असल्याचं चित्र आहे. हिंदुत्ववादी संघटनेने तर मोठी मगाणी करून आंबेडकर यांची चांगलीच कोंडी केली आहे.
हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या आणि संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर प्रकाश आंबेडकर यांनी माथा टेकून शिवभक्तांना दुखावलं आहे. त्यांनी शिवभक्तांच्या शिवभक्तीला आव्हानच दिलं आहे, असं हिंदू महासंघ मानतो. राज्यातील वातावरण बिघडण्याआधी, शिवभक्त चिडण्याआधीच सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांच्यावर कडक कलम लावून त्यांना अटक सुद्धा करावी अशी आमची भावना आहे. आमची भूमिका आहे, असं हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणावर मंत्री दादा भुसे यांनीही प्रतिक्रिया यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी कुठे दर्शन घ्यावं हा त्यांचा अधिकार आहे. पण केवळ मतांच्या ध्रुवीकरणासाठी औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी व्यक केली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबासमोर माथा टेकवला. त्याबद्दल महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. जात, धर्म आणि पक्षविरोधीच्या पलिकडे हा प्रश्न आहे. औरंगजेबाने आपल्या भावाचा खून केला. हिंदू माता भगिनीवर अत्याचार करण्याची त्या शासनात परवानगी दिली. अशा औरंगजेबाचं दर्शन घेऊन तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अपमान करत असाल तर महाराष्ट्र माफ करणार नाही, असं भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. हिंदुत्वाची पताका आमच्या हातात आहे असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांची भूमिका काय? असा सवाल करतानाच उद्या वर्धापन दिनाच्या आधी संजय राऊतही उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून औरंगजेबाचं दर्शन नाहीत ना? अशी मला शंका आहे. उद्धव ठाकरे आता हिंदुत्व बाजूला तर ठेवणार नाही ना?, असा उपरोधिक टोला भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे.