Anand Dave : औरंगाबादच्या नामांतरासाठी मतदान हा तर इम्तियाज जलील यांचा मूर्खपणा, हिंदू महासंघाच्या आनंद दवेंचे जलील यांना सवाल
औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून सुरू झालेले राज्यातील राजकारण आजही सुरूच असल्याचे दिसत आहे. या नामांतराच्या विरोधात औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबादमध्ये एक मोर्चादेखील काढला आहे
पुणे : औरंगाबादच्या नामांतर साठी मतदान करायचे असेल तर अयोध्या, काशी, मथुरा यासाठी सुद्धा मतदान घ्यावे का, असा सवाल हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांना केला आहे. त्यासोबतच त्यांचे हे विधानच मूर्खपणाचे असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते. औरंगाबादचे नामांतर करायचे असेल तर मतदान घ्या, अशी मागणी इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीचा आनंद दवे यांनी समाचार घेतला आहे. देशातल्या इतर शहरांच्या नामांतरावरही मतदान घ्यायचे का, असा उपरोधिक सवाल त्यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर (Sambhaji Nagar) करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. त्यानंतर एमआयएमने टीका केली होती.
इम्तियाज जलील
औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून सुरू झालेले राज्यातील राजकारण आजही सुरूच असल्याचे दिसत आहे. या नामांतराच्या विरोधात औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज औरंगाबादमध्ये एक मोर्चादेखील काढला आहे. त्याचबरोबर खासदार इम्तियाज जलील यांनी जर तुम्हाला औरंगाबादचे नाव बदलायच असेल तर त्यासाठी मतदान करा, अशी मागणीदेखील केली. आता त्यांच्या याच मागणीवरून हिंदू महासंघदेखील आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. आनंद दवे यांनी जलील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
औरंगाबादेत नामांतराविरोधात बॅनरबाजी
दवे यांनी जलील यांना केले सवाल
दवे म्हणाले, की देशाची फाळणी झाली, त्यावेळी मतदान करण्याचे जलील यांच्या पूर्वजांनी का नाही सुचवले? हिजाब संपवायचा की नाही, याविषयी त्यांनी सुचवावे, पुण्येश्वर मंदिराच्या बाबतीतही मतदान घ्यायचे का? समान नागरी कायद्याचे काय करायचे, 370 कलमाविषयी काय मत आहे? काश्मीरमध्ये जे हत्याकांड घडले, त्यानंतर तेथील मुस्लिमांचा मतदानाचा अधिकारच काढून घ्या, अशी भूमिका अनेक लोकांनी मांडली होती, त्यावरही मतदान घ्यायचे का? हिंदुस्थानात जिथे जिथे हिंदुंच्या आड मुस्लीम समाज येतो, त्या प्रत्येकवेळी मतदान घ्यायचे का, असा सवाल दवे यांनी इम्तियाज जलील यांनी केला आहे.