Pune Anand Dave : ‘…नाही तर कारसेवा अटळ’; पुण्यातल्या पुण्येश्वर मंदिर अन् मशिदीसंबंधी आनंद दवेंनी काय इशारा दिला?
नागेश्वर मंदिरामध्ये हिंदू महासंघाने शपथ घेतली होती, की पुण्येश्वर महादेवाचे मंदिरही आम्ही लवकर मोकळे करू. आता ती वेळ आली आहे. यासंबंधी मनसेने मांडलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असे आनंद दवे म्हणाले.
पुणे : पुण्येश्वर मंदिराच्या (Punyeshwar temple) इथे महादेव मंदिर नाही. तिथे छोटा दर्गा होता, तो आता मोठा झाला आहे. पुण्येश्वर महादेवाचे मंदिर मोकळे करण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. यासंबंधी मनसेने घेतलेली भूमिका योग्यच असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ज्या पुणे शहराला महादेवाच्या नावाने पुणे हे नाव पडले, ते पुण्येश्वर मंदिर तेथे उपलब्ध नाही. आता हिंदू महासंघ आणि मनसे (Pune MNS) एकत्र आले तर आम्ही लवकरच मंदिर मोकळे करू. पुरावे देण्याचा वेळ गेली. ज्ञानवापीसारखे काय करायचे ते करा, नाहीतर कारसेवा अटळ आहे, असा इशाराच त्यांनी याप्रकरणी दिला आहे. त्यामुळे पुण्यातील मंदिर-मशिदीच्या वादात आता हिंदू महासंघानेही उडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
एकत्र येण्याचे आवाहन
पुण्येश्वर मंदिर हे प्राचीन आहे. मात्र याठिकाणी इस्लामी आक्रमणानंतर आधी दर्गा उभारण्यात आला. आता तो दर्गा विस्तृत झाला असून त्याचे मशिदीत रुपांतर झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून पुण्यातील हिंदुत्ववादी संघटना त्यासाठी भांडत आहेत. ज्यादिवशी काशी विश्वेश्वरामध्ये महादेवाची पिंड सापडली, त्यादिवशी आम्ही उत्सव साजरा केला. नागेश्वर मंदिरामध्ये हिंदू महासंघाने शपथ घेतली होती, की पुण्येश्वर महादेवाचे मंदिरही आम्ही लवकर मोकळे करू. आता ती वेळ आली आहे. यासंबंधी मनसेने मांडलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो, असे आनंद दवे म्हणाले. तसेच याप्रकरणी एकत्र येण्याचे आवाहनही केले आहे.
काय म्हणाले आनंद दवे?
‘हिंदूंना न्यूनगंड तयार व्हावा, हा त्यांचा उद्देश’
गेली अनेक वर्षे पुणेकर कोर्ट कचेऱ्या करीत आहेत. मात्र तिथे एक फलक आहे, तो मुस्लिमांनी जाणीवपूर्व ठेवला असल्याचा आरोप दवे यांनी केला आहेत. ते म्हणाले, की येणाऱ्या मुस्लीम भाविकांना त्यांना दाखवायचे आहे, की पाहा आम्ही हिंदू मंदिरांच्या जागी मशिद बांधली. यातून हिंदूंना एकप्रकारचा न्यूनगंड तयार व्हावा, हा उद्देश आहे. आता पुरावे देण्याची वेळ गेली, असे म्हणत त्यांनी आपली आक्रमक भूमिका जाहीर केली आहे.