“बारामतीमध्ये अजित पवारांचा गेम, विधानसभेत बर्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी घडवलं”
लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि अध्यक्ष अजित पवार यांना मोठा धक्का बसला. फक्त एक उमेदवार त्यांचा निवडून आला आहे. अशातच त्यांच्याबाबत एका नेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. पहिल्यांदाच पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये घरातील सदस्य एकमेकांच्या विरोधात उभे राहिले होते. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. सुप्रिया सुळे यांचा विजय झाला तर सुनेत्रा पवारांना पराभवाचा सामना करावा लागला. सुप्रिया सुळे दीड लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आल्या. अजित पवारांसाठी मोठा धक्का होता, कारण घरातील उमेदवाराचा त्यांचा हा दुसरा पराभव झालाय. मात्र अशातच अजित पवार यांचा गेम केला गेल्याचं वक्तव्य एका नेत्याने केलं आहे.
बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवारांचा गेम केला गेला. महायुती मधल्या एकाही नेत्याने काम केलं नाही. विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील या नेत्यांनी युतीधर्म पाळला नाही. अजित दादांचा ठरवून पराभव करण्यात आला. अजित पवार यांची विधानसभेत बर्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी हे सगळं घडवून आणलं गेल्याचं दावा हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी केला आहे. इतकंच नाहीतर अजित पवार यांना एक सवालही केला आहे.
चंद्रकांत पाटील यांच विधान 100 टक्के चुकीचं मात्र मोदींनी अतृप्त आत्मा म्हणणं देखील धोकादायक अजित पवार यावर नाराजी व्यक्त करणार का? असा सवाल आनंद दवे यांनी पवारांना केला आहे. निवडणुकी दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत जाऊन “आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त वजनदार आहे, भाजपला हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली आहे, असे वक्तव्य केलं होतं. आता निकालानंतर पाटलांच्या याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच कोथरूड मतदारसंघात बॅनर्स लावून प्रत्युत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोथरूड विधानसभेच्या वतीने कोथरूड मतदारसंघात ठीक ठिकाणी अशे बॅनर्स लावण्यात आले. बॅनरवर “पवार साहेबांच्या पराभवाची वाट पाहणाऱ्या लोकांसाठी फक्त एकच वाक्य, काही करा पण पवार साहेबांचा नाद करू नका” असा मजकूर अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी बॅनर्स वर लिहिला आहे.