पुणे : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस होता. याबद्दल पुणे येथे राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ उपस्थित होत्या. निवेदिता सराफ म्हणाल्या, अशोकपर्व हा सोहळा अत्यंत सुंदर झाला. रावे गृपनं हा सोहळा आयोजित केला. रसिकांनी या सोहळ्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्याबद्दल अशोक सराफ आणि माझ्यातर्फे मी खूप ऋणी आहे. एखाद्या माणसानं खूप प्रसिद्धी मिळविली. त्याला यश मिळालं. पैसा मिळविला की तो यशस्वी आहे, असं मानलं जातं. पण, माझ्यासाठी यशाची व्याख्या थोडीशी वेगळी आहे.
आयुष्यात मिळालेल्या नातेसंबंधात किती यशस्वी झालात. ते तुमचं खरं यश आहे. अशोक एक यशस्वी कलाकार आहे. अशोक एक यशस्वी अभिनेता आहे. त्यांच्यावर रसिकांनी भरभरून प्रेम केलं, असं निवेदीता सराफ यांनी सांगितलं.
पुत्र असावा असा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं म्हणतात. आईवडिलांना अभिमान वाटेल, असा तो छान मुलगा आहे. त्याच्या पादुका घेऊन राज्य करावं असा तो भाऊ आहे. पिता म्हणून तो ग्रेट आहे. मुलाला कधी नाही म्हटलं नाही. मुलाला सपोर्ट केला नि करत राहील.
एक उत्तम मित्र आहे. त्याचबरोबर ते स्वतःशीच नाही तर दुसऱ्याशीही प्रामाणिक आहेत. अशी माणसं फार कमी मिळतात. अशा एकाची मी पत्नी आहे. त्यामुळं स्वतःला खूप भाग्यवान समजते. असा तो पती आहे, असंही निवेदीता सराफ म्हणाल्यात.
त्याच्या आयुष्यात त्यानं माझ्या आईची खूप सेवा केली. असा जावई सर्वांना मिळावा, असा तो जावई आहे. सर्व नातेसंबंधात तो यशस्वी ठरला. अशोक सराफ हा एक यशस्वी माणूस आहे, असंही त्यांनी सांगितलं.