पुणे : पुण्यात एका 21 वर्षीय महिलेचे ट्रॅव्हल्समधून अपहरण करत तिच्यावर बलात्कार (Raped) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही महिला काम शोधण्यासाठी बाहेर गावावरून आपल्या पतीसोबत पुण्यात आली होती. पुण्यात राहण्यासाठी ते खोली शोधत होते. पुण्यात कोणीच नसल्याने दाम्पत्याने स्वारगेट स्थानकात झोपण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी संबंधित आरोपीने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगितले. त्यानंतर पती बाहेर गेल्याने ट्रॅव्हल्स अचानक सुरू करून कात्रज (Katraj) परिसरात घेऊन जात महिलेवर बलात्कार केला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पती वॉशरूमला जाताच त्याने हे कृत्य केले आहे. याबाबत 21 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police station) तक्रार दिली. त्यानंतर स्वारगेट पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे पाठलाग करून चालक नवनाथ शिवाजी भोंग (38) याला अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की पीडित महिला पतीसोबत पुण्यात आली होती. पुण्यात दोघे राहण्यासाठी खोली शोधत होते. रात्री अकरा-साडे अकराच्या दरम्यान दाम्पत्य स्वारगेट याठिकाणी आले. तिथे आरोपीने गाडी लावलेली होती. रात्र झाल्यामुळे आरोपी भोंग याने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगितले. दोघेही नवीन असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. काही वेळानंतर महिलेचा पती वॉशरूमला गेला. याचा गैरफायदा घेत ट्रॅव्हल बसचा चालक नवनाथ शिवाजी भोंग याने गाडी सुरू केली आणि आडमार्गाला घेऊन गेला. स्वारगेट बसस्थानकाच्या परिसरातील अंधार असलेल्या ठिकाणी या महिलेला घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर बस कात्रज परिसरात नेली आणि तेथेदेखील दुसऱ्यांदा महिलेवर बलात्कार केला.
इकडे महिलेचा पती आपल्या पत्नीचा शोध घेत होता. मात्र बस आणि पत्नी दोघेही त्याला दिसून आले नाहीत. तत्काळ त्याने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून लगेच शोध घेतला आणि नवनाथ भोंग याच्या मुसक्या आवळल्या. दोन-तीन पथके होती. त्यातील एका पथकाला तो सकाळी सात-साडे सातदरम्यान कर्नाटककडे जाताना आढळून आला. त्याला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यावेळी तो पळून गेला. नंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला अटक केली आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत आरोपी ट्रॅव्हल्सचा चालक नवनाथ शिवाजी भोंग याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी दिली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.