कार्यकारी अध्यक्षपद मिळालं, रिपोर्टिंग कुणाला करणार?; सुप्रिया सुळे यांनी घेतलं ‘या’ नेत्यांचं नाव
मी शरद पवारांची मुलगी आहे म्हणून मी देशात मी पहिलीस येते का? तिथे बसलेले जे प्रिन्सिपल आहेत ते तर माझे वडील नाहीत. जेव्हा मला सातत्याने संसद रत्न मिळतो तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसत नाही.
पुणे : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तसेच त्यांच्यावर महाराष्ट्राचीही जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, पक्षात छगन भुजबळ, अजित पवार, जयंत पाटील, एकनाथ खडसे यांच्यासारखे सीनियर नेते असताना सुप्रिया सुळे आता कुणाला रिपोर्टिंग करणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. त्यावर स्वत: सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. कुणा कुणाला रिपोर्टिंग करणार हे त्यांनी नेत्यांची नाव घेऊनच सांगितलं आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रिपोर्टिंग पासून ते घराणेशाहीपर्यंत ते अजित पवार यांच्या नाराजीपर्यंतच्या प्रश्नांची उत्तरे दिली. मी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांना रिपोर्ट करणार आहे. राज्यात छगन भुजबळ, अजित दादा आणि जयंत पाटील यांना रिपोर्ट करणार. मी महाराष्ट्राची प्रभारी आहे म्हणजे दडपशाही नाही. हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. विशिष्ट रिपोर्टिंग सिस्टम असायला हे टीव्हीचं चॅनल नाही.हा पक्ष आहे. आम्ही सेवा करायला आलो आहे. त्यामुळे रिपोर्टिंगचा प्रश्न येतो कुठे? अर्थातच जबाबादारी सर्वांवर असेल. प्रत्येकजण पक्ष कसा वाढवायचं हे काम करणार आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
लॉबिंगने पक्ष चालत नाही
तुम्ही कार्यकारी अध्यक्ष व्हाव्यात म्हणून अजित पवार यांनीच लॉबिंग केल्याचं सांगितलं जातं, असं विचारताच त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. तुम्हाला ज्या गोष्टी माहीत आहे. त्या मला माहीत नाही. तुमच्याकडून माहिती घेऊन मी माझं जनरल नॉलेज वाढवत आहे. ग्लास अर्धा आहे की पूर्ण आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. तुम्हाला गॉसिपच करायचं आहे आणि तुम्हाला वास्तवतेपासून दूर रहायचं असेल तर त्यावर मी काय उत्तर देऊ, असं सांगतानाच आमचा पक्ष लॉबिंगने चालत नाही. हा पक्ष चर्चेतून चालतो. यात दडपशाही नाही. हा लोकशाहीवादी पक्ष आहे. जे काही निर्णय होतात ते सर्व चर्चा करूनच होतात, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजितदादा विरोधी पक्षनेते
अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांवरही त्यांनी उत्तर दिलं. दादा हे विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेत्याची पोझिशन ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने असते. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्याचा रोल बरोबरीचा असतो, असं त्या म्हणाल्या.
घराणेशाही रास्तच
केवळ शरद पवार यांची कन्या असल्यामुळेच कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाली. ही घराणेशाही असल्याची चर्चा आहे, असं विचारताच घराणेशाहीच आहे. त्यातून मी कसं पळ काढू शकते. ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. जेव्हा लोक माझ्यावर आरोप करतात, ज्या पक्षातील लोक आरोप करतात त्यांच्या पक्षातील घराणेशाही मी पार्लमेंटमध्ये डेटासहीत दाखवली आहे. एक बोट माझ्याकडे येतं तेव्हा तीन बोटं त्यांच्याकडे जातात. घराणेशाही रास्तच आहे. त्यात गैर काय? माझ्या ज्या घरात जन्म झाला. त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असं त्या म्हणाल्या.
तुम्हाला घराणेशाही दिसते
मला संसदेत संसद रत्न मिळतं किंवा एक नंबरचं रँकिंग मिळतं तेव्हा माझे वडील मला पास करत नाहीत. मी शरद पवारांची मुलगी आहे म्हणून मी देशात मी पहिलीस येते का? तिथे बसलेले जे प्रिन्सिपल आहेत ते तर माझे वडील नाहीत. जेव्हा मला सातत्याने संसद रत्न मिळतो तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसत नाही. सोयीप्रमाणे तुम्हाला घराणेशाही दिसते. तुम्ही परफॉर्मन्स पाहा ना, असंही त्या म्हणाल्या.