विनय जगताप, पुणे : पुण्यातील बालगंधर्व चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आदोलनाला राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी आपला पाठींबा दर्शविला आहे. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सरकार खेळत असल्याचा आरोप रूपाली ठोंबरे यांनी केला आहे. या आंदोलक विद्यार्थ्यांनी एमपीएससीचा नविन ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2025 पासून लागू करावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. या मागणीला रूपाली ठोंबरे यांनी पाठींबा दर्शविला आहे. सरकार जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेत नाही तोपर्यंत आपण येथून हलणार नाही असे आव्हानही रूपाली ठोंबरे यांनी सरकारला दिले आहे.
पुण्यातील बालगंधर्व चौकात ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न 2025 पासून लागू करा या मागणी साठी सुरू असलेल्या, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी सोमवारी हजेरी लावत पाठींबा दर्शवला आहे. यावेळी रूपाली ठोंबरे यांनी सरकार दुसरा अभ्याक्रम आणून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य खराब करीत असल्याचा आरोप रूपाली ठोंबरे यांनी केला आहे. जोपर्यंत सरकार एमपीएससी विद्यार्थ्यांचे ऐकत नाही तोपर्यंत आपणही विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात बसून राहू अशी भूमिकाही रुपाली ठोंबरे यांनी घेतली आहे.
आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय
राज्यसेवा परीक्षेसाठी आयोगाने लागू केलेला लेखी पॅटर्न हा 2025 नंतर लागू व्हावा यासह प्रमुख मागण्यांसाठी ‘एमपीएससी’च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने मध्यंतरी तोंडी आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती उमेदवारांना केली होती. परंतू याबाबत लेखी आश्वासन दिल्या शिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय उमेदवारांनी घेतला आहे. पुण्यातील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला युवक काँग्रेसनेही पाठींबा दर्शवला आहे.
सर्व परीक्षा या जुन्या वस्तुनिष्ठ पद्धतीने घ्याव्यात
राज्यसेवा परिक्षेसाठी जो लेखी पॅटर्न आयोगाने लागू केला तो पॅटर्न 2025 नंतर लागू करण्यात यावा, आता घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा या जुन्या वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात याव्यात, जुनाच पॅटर्न 2025 पर्यंत कायम ठेवण्यात यावा, अशा मागण्या एमपीएससी उमेदवारांनी केल्या आहेत. सरकारने या मागण्यांची तत्काळ दखल घ्यावी, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विविध शासकीय विभागातील स्पर्धात्मक तसेच सरळ सेवेतून 75 हजार शासकीय पदे भरण्याची घोषणा शासनाने केली होती. ही पदे तातडीने भरली जावीत अशी अपेक्षा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.