पुणे | 17 डिसेंबर 2023 : विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात पुन्हा अघोरी प्रकार घडला आहे. आपल्या व्यावसायिक स्पर्धेतील मित्राचा काटा काढण्यासाठी चक्क त्याच्यावर स्मशानात जाऊन अघोरी पूजा घालत या पूजेचा व्हिडीओ व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केल्याचा सनसनाटी आणि धक्कादायक प्रकार लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. या घटनेने एक खळबळ उडाली असून या प्रकरणाचा जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढत असतानाच अजूनही जादूटोणा, करणी, बाबा बुवा यांच्या नादाला लागण्याचे प्रमाणही वाढत आहे. ग्रामीण भाग असो वा शहरी अशा सर्वच ठिकाणी अंधश्रध्दा जोपासण्याचा सपाटा वाढत चालला आहे. असाच एक प्रकार पुण्यातील हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथे घडला आहे. या ठिकाणी एकाने आपल्या प्रतिस्पर्धक मित्राचा मृत्यू होण्यासाठी चक्क स्मशानात अघोरी पूजा केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या पूजेचा व्हिडीओ चित्रित करून तो स्पर्धक मित्राच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हायरल करण्याचा प्रकार घडला आहे.
लोणी काळभोर हद्दीतील गणेश चौधरी आणि त्याच्या मित्राचा सोरतापवाडी येथे प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. गेल्या एक वर्षांपासून या दोघाचे व्यवसायात वाद होत होते. या वरून आरोपी गणेश चौधरी याने सोरतापवाडीच्या स्मशान भूमीत चितेला अग्नी देण्याच्या ठिकाणी लिंबू कापून त्याला हळद कुंकू लावून अघोरी पूजा केल्याचा व्हिडीओ 22 नोव्हेंबर 2023 रोजी स्पर्धक मित्राच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल केला. यावरून महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट,अघोरी प्रथा व जादूटोना प्रतिबंध कायदा अंतर्गत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.