आता सुटीच्या दिवशीही पुण्यात मिळकतकर भरणा केंद्र सुरू राहणार, सवलतीच्या दरात कर भरता येण्यासाठी निर्णय
पुण्यात आता शनिवारी आणि रविवारी देखील मिळकतकर भरता येणार आहे. नागरिकांना सवलतीच्या दरात कर भरता यावा यासाठी सुटीच्या दिवशी देखील मिळकतकर भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : मिळकतदारांना सवलतीच्या दरात मिळकतकर भरता यावा यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी देखील मिळकतकर (Income tax) भरणा केंद्रे सुरूच ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांना मिळकतकर भरण्यासाठी प्रोत्याहन मिळावे यासाठी जे मिळकतधारक एक एप्रिल ते 31 मे या कालावधीत मिळकतकर भरतील त्यांना करामध्ये (tax) पाच ते दहा टक्के सूट देण्यात येणार आहे. ज्या मिळकतदारांची वार्षिक करपात्र (Taxable) रक्कम ही 25 हजारांपेक्षा कमी आहे, अशा नागरिकांना करामध्ये दहा टक्के सूट तर ज्यांच्या कराची रक्कम ही 25 हजारांपेक्षा अधिक आहे, त्यांना पाच टक्के सूट देण्यात येत आहे. ही सवलत 31 मेपर्यंत असल्याने लोकांना सवलतीच्या दरात मिळकतकर भरता यावा यासाठी शनिवार आणि रविवार अशा दोनही दिवस मिळकतकर भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळकतकरात वाढ
यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत मिळकतकरामध्ये वाढ झाली आहे. 1 एप्रिलपासून ते 27 मे कालपर्यंत एकूण चार लाख 92 हजार 752 मिळकतधारकांनी 751 कोटी 31 लाख रुपये करापोटी जमा केले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रक्कम 190 कोटी 77 लाख रुपयांनी वाढली आहे. मिळकतकर वेळेवर भरला जावा यासाठी मिळकतदारांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना मिळकतकरावर पाच ते दहा टक्के सूट देखील देण्यात आली आहे. या सुटीचा एकूण आकडा आतापर्यंत 16 कोटी 60 लाखांवर पोहोचला आहे.
मिळकतदारांना दिलासा
मिळकतकर वेळेवर भरावा यासाठी महापालिकेच्या वतीने मिळकतदारांना करावर पाच ते दहा टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. मात्र जे मिळकतदार 1 एप्रिल ते 31 मेपर्यंत आपला कर जमा करतील त्यांनाच ही सूट देण्यात आली आहे. आता 31 मेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यात शनिवार आणि रविवारची सुटी आहे. काही कारणांमुळे अनेकांचा मिळकत कर भरण्याचा राहून गेला आहे. महापालिकेने सुटीच्या दिवशी देखील मिळकत कर भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आता ज्यांचा कर भरायचा राहिला आहे, त्यांना देखील सवलतीच्या दरात कर भरणे शक्य होणार आहे.