Auto fare hike : भाडेवाढ करा, इंधन अन् सीएनजीच्या दरवाढीनंतर ऑटोरिक्षा संघटनांची आरटीओकडे मागणी; अद्याप ग्रीन सिग्नल नाही!
वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या सीएनजी आणि स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या पीएनजीच्या किंमतीत मागील काही दिवसांत 70 टक्क्यांनी वाढ झाली. आयात तेल आणि नैसर्गिक वायूंवरील अवलंबित्व अधिक वाढल्याने किंमती वाढल्या आहेत.
पुणे : इंधन आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) किंमतीत वाढ झाल्याने शहरातील ऑटोरिक्षा चालकांनी भाडेवाढीची मागणी केली आहे. 12 ऑगस्ट रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयासोबत (RTO) झालेल्या बैठकीत, ऑटोरिक्षा संघटनांनी पहिल्या 1.5 किमीसाठी 6 रुपये भाडेवाढ प्रस्तावित केली होती आणि प्रति किमी 4 रुपये वाढ सुचवली होती. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणासमोर (RTA) चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मागणी मांडली जाईल, असा प्रस्ताव होता. ऑटोरिक्षा महासंघाचे नेते बापू भावे म्हणाले, की प्रति किलो सीएनजीचा दर ₹ 90 पर्यंत पोहोचला होता, म्हणून आम्ही भाडे वाढवण्याची मागणी केली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे म्हणाले, की भाडेवाढीबाबत 12 ऑगस्ट रोजी बैठक झाली आणि अंतिम निर्णयासाठी हे प्रकरण आरटीएसमोर ठेवण्यात आले आहे. अद्याप यावर निर्णय झालेला नाही.
सीएनजी-पीएनजीच्या दरांत अल्पशी कपात
पुणे विभागाच्या आरटीएने 1 ऑगस्टपासून ऑटोरिक्षाच्या भाड्यात 2 रुपयांनी वाढ केली होती. प्रस्तावानुसार, ऑटोंना पहिल्या 1.5 किमीसाठी रू. 21 ऐवजी 23 रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी प्रचलित 14 रुपयांऐवजी ₹ 15 आकारले जाणार होते. याबाबतची अधिसूचना आरटीएने 25 जुलै रोजी जारी केली होती आणि नंतर ती 28 जुलै रोजी स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सीएनजी आणि पीएनजी दरात प्रतिकिलो क्रमश: 6 आणि 4 रुपयांची कपात करण्यात आली होती.
मागील काही दिवसांत जवळपास 70 टक्के वाढ
वाहनांमध्ये वापरल्या जाणार्या सीएनजी आणि स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या पीएनजीच्या किंमतीत मागील काही दिवसांत 70 टक्क्यांनी वाढ झाली. आयात तेल आणि नैसर्गिक वायूंवरील अवलंबित्व अधिक वाढल्याने किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मात्र हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या दर काहीसे कमी झाले असले तरी ते सामान्यांना परवडणारे नाहीत. त्या पार्श्वभूमीवर ऑटोरिक्षा चालकांनी भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे.
ऑटोरिक्षा चालकांचा सीएनजीवर भर
ल-वाढत्या पेट्रोडिझेलच्या किंमती या परवडण्याच्या बाहेर गेल्या आहेत. त्या तुलनेत सीएनजी-पीएनजी स्वस्त म्हणून अनेकांनी याला प्राधान्य दिले. मात्र आता पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी-पीएनजीमध्ये फारच कमी अंतर उरले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची अडचण वाढली असून भाडेवाढीशिवाय पर्याय नाही, असे त्यांचे मत आहे.