Viral infection : वातावरणातल्या बदलामुळे साथीचे रोग वाढले, काय काळजी घ्याल? डॉक्टर काय सांगतायत? वाचा…
पावसाळा सुरू झाला की विविध आजरांच्या साथी पसरत असतात. पाऊस सुरू झाल्यावर हवेत निर्माण होणारा गारवा आणि पाऊस थांबल्यानंतर अचानक येणारे दमट आणि उष्ण हवामान या आजारांसाठी कारणीभूत ठरतात, असे अविनाश भोंडवे म्हणाले.
पुणे : वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे पुणे शहर आणि पुण्यातल्या ग्रामीण भागात साथीच्या आजारांनी (Viral infection) डोके वर काढले आहे. कडक ऊन, मध्येच ढगाळ स्थिती, हलकासा पाऊस असे वातावरणात सतत बदल होत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, पोटदुखी असे साथीचे आजार वाढत आहे. या आजाराने नागरिक त्रस्त आहेत. कोरोनासह (Corona) मंकी पॉक्स आणि स्वाइन फ्लूचेही रुग्ण वाढत आहेत. त्याचबरोबर लहान मुलांच्या आजारांतही लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, ही रुग्णांची वाढ (Patients increase) का होत आहे, त्यावर खबरदारी म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, या विषयी आयएमचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे यांनी खबरदारीचा उपाय सांगितला आहे. वेळीच उपचार केले नाहीत, तर कोरोना, स्वाइन फ्लू सारखे आजार नंतर उग्र रूप धारण करतात, असेही डॉक्टरांनी सांगितले.
दमट आणि उष्ण हवामान कारणीभूत
पावसाळा सुरू झाला की विविध आजरांच्या साथी पसरत असतात. पाऊस सुरू झाल्यावर हवेत निर्माण होणारा गारवा आणि पाऊस थांबल्यानंतर अचानक येणारे दमट आणि उष्ण हवामान या आजारांसाठी कारणीभूत ठरतात. या दिवसात श्वासनाचे आजार असलेल्या विषाणूंची संख्या अधिक वाढते. सर्दी, खोकला, ताप याबरोबरच कोरोना, स्वाइन फ्लू, मंकी पॉक्सचे रुग्ण वाढले आहेत. तर लहान मुलांच्या विविध आजारांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्वरित आजाराचे निदान करून योग्य ते उपचार करावेत, असे अविनाश भोंडवे म्हणाले.
काय काळजी घ्यावी?
इन्फ्लूएंझा या विषाणूसाठीही हे वातावरण पोषक असते. याच काळात कोरोनाचे विषाणू विशेषत: ओमिक्रॉनच्या उपप्रकारातील विषाणूनेही हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. त्याचा त्रास जास्त होत नसला तरी रुग्णसंख्या वाढत आहे. मंकीपॉक्स हा देवीसारखा आजार आहे. आठ दिवसांत हा आजार बरा होत असला तरी रुग्णाच्या संपर्कात आल्यास म्हणजे त्या पुरळांना स्पर्श झाल्यास हा आजार पसरतो. तर यासारखाच हँड, फूट, माऊथ हा आजार लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बरा होणारा आहे. मात्र अशावेळी लहान मुलांना शाळेत पाठवू नये, विलगीकरण करावे, असे अविनाश भोंडवे म्हणाले.