Pune traffic : पुण्यात सिग्नल वेटिंगची वेळ वाढवली, वाहतुकीचं अधिक चांगलं व्यवस्थापन करण्यासाठी निर्णय
विविध चौकांत सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळी मोठ्या वाहतूककोंडीला वाहनधारकांना सामोरे जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहेत.
पुणे : गर्दी कमी करण्यासाठी आणि ट्रॅफिक जॅमवर लक्ष ठेवण्यासाठी, पुणे वाहतूक पोलीस विभागाने (Pune City Traffic Police) आता शहरातील मुख्य चौकांमध्ये प्रवाशांसाठी सिग्नल वेटिंगची वेळ वाढवली आहे. 90 ते 120 सेकंदांचा प्रतीक्षा वेळ आता 150 ते 180 सेकंदांपर्यंत वाढवण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक कोंडी (Traffic jam) आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. काही रस्त्यांवर पुणे मेट्रो प्रकल्पाच्या (Pune metro project) सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी होत आहे, तर खड्ड्यांमुळे प्रवाशांना आधीच अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरात वाहनांची संख्या वाढली आहे आणि त्यामुळे रहदारीचे अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी मार्ग शोधत राहण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘अतिरिक्त गर्दी मिटवण्यास प्राधान्य’
पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल श्रीरामे याविषयी म्हणाले, की वाहतूक जलद होण्यासाठी आणि रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस विभागाकडून आता शहरात आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत. उदाहरणार्थ, गंगाधाम चौकात, वेटिंगची वेळ आता 150 सेकंदांवर गेली आहे, कारण हा चौक मुख्य रस्त्यांना सर्व बाजूंनी जोडतो. तर, अंतर्गत लेन रस्त्यांना कमी वेळ दिला जातो आणि मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची अतिरिक्त गर्दी मिटवण्यासाठी प्राधान्य दिले जाते. विविध चौकांत सकाळी तसेच संध्याकाळच्या वेळी मोठ्या वाहतूककोंडीला वाहनधारकांना सामोरे जावे लागते. त्या पार्श्वभूमीवर उपाययोजना वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहेत.
रहदारीचे प्रमाण खूपच जास्त, नागरिकांच्या तक्रारी
अहमदनगर रोड, सिंहगड रोड आणि इतर प्रमुख रस्त्यांवरदेखील स्थानिक वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबत आवश्यकतेनुसार आम्ही आमच्या वाहतूक अधिकार्यांना निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे श्रीरामे म्हणाले आहेत. आम्ही रोज गंगाधाम चौकातून स्वारगेटकडे कामानिमित्त प्रवास करत असतो. गेल्या काही दिवसांपासून आम्हाला चौक ओलांडण्यासाठी दोन किंवा तीन लाल सिग्नलवर थांबावे लागत आहे. कारण रहदारीचे प्रमाण खूपच जास्त आहे आणि वाट पाहण्याची किंवा वेटिंगची वेळ वाढली आहे, असे जवळच्या भागातील रहिवाशांनी सांगितले.