Monsoon : पुणे शहरात 8 सप्टेंबरपासून वाढणार पावसाचा जोर, गणपती विसर्जनाच्या दिवशीही राहणार मुसळधार? वाचा…
या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात 31 टक्के जास्त पाऊस झाला आहे. हवामान खात्यानुसार या हंगामात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सामान्य किंवा जास्त पाऊस झाला आहे.
पुणे : पुणे शहरात 8 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता (Heavy rain) आहे. भारतीय हवामान विभागाने ही शक्यता वर्तवली आहे. पुणे शहरातील अनेक भागांत काल (रविवारी) संध्याकाळी काहीशा मुसळधार पावसाची नोंद झाली. तर साधारणपणे गुरुवारपासून (8 सप्टेंबर) पावसाचा जोर वाढणार आहे. गणपती विसर्जनाच्या शेवटच्या दिवशी आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाच्या (India Meteorological Department) अधिकाऱ्यांनी सांगितले. पुणे आयएमडी येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) यांनी सांगितले, की शहर आणि घाट भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 8 सप्टेंबरपासून पुणे शहरात पावसाचा जोर लक्षणीयरित्या वाढणार आहे. लगतच्या घाट भागात तर मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबरपर्यंत सलग पाऊस पडणार आहे. मात्र, याबाबत अधिक स्पष्ट अंदाज अजून काही तासांनी वर्तवण्यात येईल, असे कश्यपी म्हणाले.
पावसाची तीव्रता असणार अधिक
आयएमडीच्या अंदाजानुसार, 8 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबर रोजी पुणे शहरात जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील घाट माथ्याच्या परिसरात पावसाची तीव्रता अधिक असणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील तुरळक ठिकाणे आणि विदर्भात सप्टेंबरपर्यंत वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मान्सून सक्रिय
महाराष्ट्रात सक्रिय मान्सून असल्याने 1 जून ते 4 सप्टेंबर दरम्यान राज्यात सरासरीपेक्षा 17 टक्के जास्त पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अतिवृष्टी झाली आहे. या दरम्यान कोकण आणि गोव्यात मात्र सामान्य पावसाची नोंद झाली आहे.
31 टक्के जास्त पाऊस
या पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात 31 टक्के जास्त पाऊस झाला आहे. हवामान खात्यानुसार या हंगामात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सामान्य किंवा जास्त पाऊस झाला आहे. पावसाने मध्यंतरी काहीशी विश्रांती घेतली होती. दिवसाच्या तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका पुणेकरांना जाणवत होता. आता पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.