कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदी केशरबाई पवार तर उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर बिनविरोध
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच कात्रज दूध संघाच्या (Katraj) अध्यक्षपदी केशरबाई पवार (शिरूर) आणि उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर (दौंड) यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) सहकार पॅनेलने 16 पैकी 15 जागा जिंकल्या आहेत.
पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच कात्रज दूध संघाच्या (Katraj) अध्यक्षपदी केशरबाई पवार (शिरूर) आणि उपाध्यक्षपदी राहुल दिवेकर (दौंड) यांची बिनविरोध निवड झाली आहे. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची निवडणूक नुकतीच पार पडली. राष्ट्रवादीच्या (NCP) सहकार पॅनेलने 16 पैकी 15 जागा जिंकल्या आहेत. अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी रविवारी (दि. 3) सर्किट हाऊस येथे इच्छुक संचालकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. दरम्यान केशरबाई पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली असून राष्ट्रवादीने जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद प्रथमच महिलेला दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षश्रेष्ठींनी दिलेली नावे सोमवारी संचालकांसमोर सांगितली. दोघांचीही निवड बिनविरोध झाली आहे.
बिनविरोध घोषित केली नावे
सोमवारी (दि. 4) संघाच्या मुख्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलिंद सोबले आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब तावरे यांनी सकाळी साडे अकरा वाजता अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचे कामकाज सुरू केले. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी केशरबाई पवार आणि उपाध्यक्षपदासाठी राहुल दिवेकर यांचेच अर्ज आले. त्यामुळे दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध घोषित केली.
कार्यकर्त्यांनी केली फटाक्यांची आतषबाजी
कात्रज दूध संघाच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून केशरबाई पवार यांनी काम पाहिले आहे. कात्रज दूध संघावर त्या चौथ्यादा विजयी झाल्या आहेत. तर राहुल दिवेकर हे प्रथमच विजयी झाले असून, पहिल्याच निवडणुकीत उपाध्यक्षपद मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. दरम्यान, या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला.