पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या एक नाव चांगलच गाजतंय ते म्हणजे किरीट सोमय्या (Kirit Somaiya). काही दिवसांपूर्वीच सोमय्या (Sanjay Raut) राऊतांविरोधात तक्रार करण्यासाठी पुण्यात गेले. त्यानंतर त्यांना महापालिकेच्या पायऱ्यांवर शिवसेनेकडून (Shivsena) धक्काबुक्की करण्यात आली. त्यात जखमी झालेल्या सोमय्यांना रुग्णलयातही दाखल करण्यात आलं. त्यानंतर हे प्रकरण पार दिल्लीपर्यंत गाजलं. एवढा गदारोळ झाल्यानंतर आज सोमय्या पुन्हा पुण्यात गेले आहेत. ज्या पायऱ्यांवर सोमय्यांना धक्काबुक्की झाली त्याच पायऱ्यांवर त्यांचा सत्कार करण्याचा घाट भाजपने घातला होता. मात्र काँग्रेसकडून लगेच विरोधाची हाक देण्यात आली. महापालिकेनेही सोमय्यांच्या सत्काराला परवानगी नाकारली. मात्र ज्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली त्याच पायऱ्यावर भाजपने विरोध झुगारून सोमय्यांचा सत्कार केला आहे. आज सोमय्यांच्या स्वागताला भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी गर्दी अनावर झाल्याने पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर करण्यात आला. त्यामुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण आहे. भाजपकडून यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.
सोमय्या काय म्हणाले?
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होणारच आज जो पोलीस बंदोबस्त होता, त्यादिवशी मात्र सर्व पळून गेले होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हिशोब द्यावा लागेल. उद्धव ठाकरेंनी मला मारण्यासाठी 100 गुंड पाठवले होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यावर कारवाई होणारच पवार आणि ठाकरे यांनी पैसे खाल्लेत संजय राऊतांनी जे पैसे खर्च केलेत. त्याचा हिशोब तर द्यावा लागेल, त्यांचा आणि पाटकर यांचा संबध काय ते त्यांनी जाहीर करावं. असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
भाजपनं करून दाखवलं
यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते महापालिकेच्या पायऱ्यावर जमले होते. भाजप नगरसेवकांनी किरीट सोय्यांचा सरकारविरोधात जोरदार घोषाबाजी करत सत्कार घडवून आणला आहे. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीकही उपस्थित होते. यावेळी या परिसरात मुंगीलाही घुसायला जागा राहिली नसेल एवढी गर्दी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. यावेळीही किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी पुणेकरांच्या जीवाशी खेळ केला आहे. बेनामी कंपनी ही संजय राऊतांची कंपनी आहे. त्या कंपनीला शंभर कोटींचं कॉन्ट्रॅक्ट देऊन फसवणूक केली आहे, असा आरोप त्यांनी केला. किरीट सोमय्या यांच्या खांद्याला खांदा लावून भाजप उभे आहे, असे यावेळी जगदीश मुळीक यांनी सांगितलं.