काही गंभीर प्रकरणात पोलिसांच्या दिरंगाईने संताप व्यक्त होत आहे. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या दिरंगाईने मोठा जनक्षोभ उसळला. रेल्वे सेवा आणि वाहतूक कित्येक तास बंद होती. आता एका प्रकरणात पुण्यामध्ये महिलेचे रौद्र रुप दिसले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला पोलिसांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला का? सोडलं याचा जाब विचारताना दिसत आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? का झाला या लाडक्या बहिणीचा संताप अनावर?
काय आहे प्रकरण
तक्रारदार विशाल सातव हा या महिलेचा भाऊ आहे. त्याला तीन ते चार व्यक्तींनी लाथा बुक्क्यासह प्लास्टिकच्या कॅरेटने त्याला मारहाण केली होती. हा सर्व प्रकार 9 ऑगस्ट रोजी दुपारी घडला होता या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी तीन ते चार व्यक्तींवर गुन्हा देखील दाखल केला. मात्र, त्या व्यक्तींना सोडून का? दिल याचा जाब विचारत या महिलेने पोलिसांना धारेवर धरलं होतं.
सहकारी कामगारांसोबत वाद
विशाल सातव स्विगी इन्स्टा मार्ट इथे मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याच आणि इतर कामगारांचे काही पटत नव्हतं. यातून त्यांच्यात वाद होऊन मारहाण झाली होती. जितेंद्र ओझरकर, योगेश पडळघरे यांचा सह इतर एक ते दोन जणांनी विशालला मारहाण केली होती.
पोलिसांनी तात्काळ केला होता गुन्हा दाखल
हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणात त्याच दिवशी गुन्हा दाखल केलेला आहे. विशालच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार आरोपीला अटक करा असा आग्रह तिचा होता. या गुन्ह्यात अटक करता येत नाही. असं पोलिसांचं म्हणणं आहे. आरोपींना समज देऊन सोडण्यात आलं होतं. पण सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तक्रारदाराची बहीण ही पोलिसांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीला का सोडलं याचा जाब विचारताना दिसत आहे. पोलिसांनी आरोपींना तुरुंगातच डांबून ठेवायला हवं होते, असा या महिलेचा आग्रह होता. नियमानुसार कारवाई केल्याचा माहिती पोलिसांनी दिली.