Pune rain : सिंहगड किल्ला तीन दिवस बंद राहणार? वन विभागानं जिल्हा प्रशासनाला दिलेल्या पत्रात काय म्हटलंय? वाचा…
पुणे आयएमडीचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार आहे.
पुणे : पुण्याच्या जवळ असलेला सिंहगड किल्ला (Sinhagad fort) पर्यटनासाठी तीन दिवस बंद ठेवण्यात यावा, असे पत्र वन विभागाकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. पुण्यात सुरू असलेल्या पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गाला दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे पुणे वनविभागाने (Pune forest department) जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे. मागील महिन्यात दरड कोसळून एका ट्रेकरचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट (Red alert) दिलेला आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
रस्त्यावर पाणी अन् वाहतूककोंडी
पुणे आयएमडीचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत पुणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिक या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. अत्यावश्यक असल्याशिवाय खरे तर घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण घराबाहेर पडलात तरी वाहतूककोंडी, रस्त्यावर साचलेले पाणी त्याचबरोबर रस्त्याकडील झाडे पडण्याच्या घटना वाढणार आहेत, असे कश्यपी म्हणाले.
दरड कोसळून ट्रेकरचा मृत्यू
सिंहगड परिसरात नुकताच एका ट्रेकरचा दरड अंगावर कोसळून मृत्यू झाला होता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही दुर्दैवी घटना घडली होती. 25 जूनच्या सकाळी दाट धुके असताना गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या हेमंत गाला यांच्या अंगावर दरड कोसळली. यात त्यांचा मृत्यू झाला. सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ तटबंदीच्या खालच्या भागात असलेल्या पायवाटेवर ही दरड कोसळली. अशाप्रकारच्या घटना येत्या काळात घडू नये, याकरिता आता जिल्हाधिकाऱ्यांकडे तीन दिवस गडावर पर्यटकांना बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.