Sharad Pawar : 10 वर्षांत नोकऱ्या झाल्या कमी; शरद पवार यांनी मोदींवर साधला निशाणा
Lok Sabha Election 2024 : पुणे येथील प्रचार सभेत शरद पवार यांनी गेल्या दहा वर्षांतील केंद्र सरकारच्या कामगिरीवर ताशेरे ओढले. त्यांनी आश्वासनं आणि प्रत्यक्षातील आकडेवारी समोर ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. गॅस दरवाढीसह रोजगाराच्या प्रश्नावर त्यांनी सरकारवर टीका केली.
पुण्यात महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. गेल्या 10 वर्षांत या सरकारने सर्वसामानमय जनतेला केवळ फसवल्याचा आरोप त्यांनी केला. पेट्रोल, गॅस सिलेंडर आणि नोकऱ्यांच्या आघाडीवर सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका त्यांनी केली. शब्द द्यायचा, आश्वासनं द्यायची आणि ती पाळायची नाहीत, अशी जर मोदी नीती असेल तर त्यांना पुन्हा सत्तेत न बसविण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.
10 वर्षांत नोकऱ्या कमी
दरवर्षी दोन कोटी मुलांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. पण गेल्या दहा वर्षांत नोकऱ्या कमी झाल्याचा घणाघात त्यांनी केला. सध्या देशातील तरुणाईचा जो आकडा आहे, त्यातील 86 टक्के मुलं ही बेरोजगार आहेत. त्यांच्या हाताला काम नसल्याचे ते म्हणाले. पुण्यात सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकरांसाठी महाविकास आघाडीने पुण्यात सभा आयोजीत केली होती. त्यात त्यांनी मोदी सरकारवर चौफेर टीका केली.
सत्ताधाऱ्यांनी लोकांना फसवलं
आजचा दिवस उमेदवारीचा अर्ज भरण्याचा दिवस आहे. कार्यकर्त्यांमध्ये आज प्रचंड उस्थाह पाहण्यास मिळाला. त्यामुळे तुम्ही नक्कीच जोमाने काम करणार आहात, असे ते म्हणाले. 10 वर्षे सत्ता असणाऱ्या सत्ताधारी लोकांनी फसवलं आहे, असा आरोप त्यांनी केला. 2014 मोदी सत्तेत आले त्यावेळेस पेट्रोल 71 रुपये लिटर होतं. आज पेट्रोल 105 रुपये आहेत. सत्तेचा उन्माद काय असतो ही बाब सत्ताधारी लोकांनी दाखवून दिल्याचे ते म्हणाले. लोकशाही वाचविण्यासाठी तयार राहा, असे आवाहन त्यांनी केले.
तर लोक आपल्याला विसरतील
या सभेत पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मोदी सांगत आहेत की देशाची अर्थव्यवस्था पाचवी क्रमांक झाली आहे याचा मला अभिमान आहे मात्र मनमोहन सिंग पंतप्रधान असते तर भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली असती हे आयएम चे रिपोर्ट असल्याचा दावा त्यांनी केला. भाजपाच्या जाहीरनामावर मोदींचे 42 फोटो आहेत.अनेक ठिकाणी मोदी आपला फोटो वापरत आहेत.मोदींना भीती आहे की आपला फोटो नसला तर लोक आपल्याला विसरतील, असा टोला त्यांनी लगावला.