पुण्यात महाविकास आघाडीची सभा, काय असणार रणनिती

| Updated on: Apr 07, 2023 | 2:17 PM

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विना संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा झाली होती. आता मे महिन्यात पुण्यात सभा होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीने तयारी सुरु केली आहे. रणनिती तयार करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे.

पुण्यात महाविकास आघाडीची सभा, काय असणार रणनिती
Follow us on

अभिजित पोते, पुणे : संभाजीनगरात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मूठ अधिकच घट्ट आवळलेली होती का नाही? हे स्पष्ट झाले नाही. कारण या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले नव्हते. परंतु निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान देण्यासाठी राज्यभरात संयुक्त सभांची तयारी केली आहे. राज्यात विभागनिहाय सात ठिकाणी महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा होतील. संभाजीनगरात झालेल्या पहिल्या सभेची चर्चा नाना पटोले यांच्या अनुपस्थितीमुळे अधिक झाली होती.

पुणे शहरात बैठक


महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांची सुरुवात मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथून सुरुवात झाली. रविवारी ही सभा झाली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करताना शिंदे गट व भाजपला घेरले होते. महाविकास आघाडीने जाहीर केल्यानुसार 14 मे 2023 रोजी रविवारी पुण्यातली सभा होणार आहे. या सभेची जबाबदारी स्वतः अजित पवार यांच्यावर असणार आहे.

हे सुद्धा वाचा

या सभेच्या तयारीसाठी पुण्यात उद्या शनिवारी महविकास आघाडीच्या स्थानीक नेत्यांची बैठक होणार आहे.पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. बैठकीत महाविकास आघाडीच्या सभेचे नियोजन करण्यात येणार आहे. या बैठकीत सभेची रणनिती ठरवण्यात येणार आहे.

महाविकास आघाडीच्या सभेचा कार्यक्रम असा

 

  • दुसरी सभा- 16 एप्रिल 2023 रोजी नागपुरात महाविकास आघाडीची दुसरी सभा होईल. सुनिल केदारे यांच्यावर या सभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  • तिसरी सभा-1 मे 2023 रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईत तिसरी सभा होईल. या सभेची जबाबदारी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. इथे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, आदी सर्व परिसरातील कार्यकर्ते जमा होतील.
  • चौथी सभा- 14 मे 2023 रोजी रविवारी पुण्यातली सभा होईल. या सभेची जबाबदारी स्वतः अजित पवार यांच्यावर असेल. पुण्यातील शेकाप, समाजवादी पक्ष, सगळ्यांना सभेसाठी आमंत्रित केलं जाणार आहे.
  • पाचवी सभा- 28 मे 2023 रोजी रविवारी कोल्हापुरात महाविकास आघाडीची सभा होईल. सतेज उर्फ बंटी पाटील हे पुढाकार घेतील.
  • सहावी सभा- 3 जून 2023 रोजी नाशिकमध्ये शनिवारी पुढची सभा होईल. या ठिकाणी नंदुरबार, धुळे, नाशिक जळगाव आदी ठिकाणचे कार्यकर्ते नागरिक जमा होतील. या सभेची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर असेल.
  • सातवी सभा- 6 जून 2023 रोजी अमरावतीत होणार आहे. या सभेची जबाबदारी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मृग नक्षत्राच्या आधीचा हा दिवस असल्याने यावेळी पावसाची शक्यता आहे. पावसातील सभा ऐतिहासिक होतात. त्यामुळे काहीही झालं तरी सभा होणारच, असा इशारा अजित पवार यांनी दिलाय.