सर्वात मोठी बातमी ! एकनाथ शिंदे यांच्या मनात उठावाचे बीज मीच पेरलं होतं; शिंदे गटाच्या माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट
नंदनवनमध्ये साडेचार तास चर्चा करताना मी एकनाथ शिंदे यांना सांगितलं हे चालणार नाही. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा.
पुणे: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड का घेतली? भाजपने शब्द फिरवल्यामुळेच उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी स्थापन करावी लागली का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड का केलं? त्यांना बंड करण्यास कोणी प्रवृत्त केलं? असे प्रश्न वारंवार विचारले जातात. त्याचं उत्तर ना भाजपकडून दिलं जातं, ना उद्धव ठाकरे यांच्याकडून दिलं जातंय, ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यावर खुलासा करण्यात आला. मात्र शिंदे गटाच्या माजी मंत्र्याने यावर पहिल्यांदाच खुलासा केला आहे. शिंदे यांच्या मनात उठावाचे बीज मीच पेरलं होतं असं सांगतानाच महाविकास आघाडी निवडणुकीपूर्वीच झाली होती, असा दावा या माजी मंत्र्याने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून अनेक तर्कवितर्क वर्तविले जात आहेत.
दावा करणारा माजी मंत्री दुसरे तिसरे कोणीच नसून ते आहेत विजय शिवतारे. विजय शिवतारे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मीच एकनाथ शिंदे यांच्या मनात उठावाचे बीज पेरले होते, असं सांगतानाच महाविकास आघाडी सरकार आम्हाला मान्यच नव्हतं, असा दावा विजय शिवतारे यांनी केला आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आलं ते महाराष्ट्राच्या हिताचं नव्हतं. पहिल्या दोन महिन्यातच मी आघाडी सरकारच्या विरोधात उचल खाल्ली होती. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर दोन महिन्यानंतरच मी नंदनवनला गेलो होतो. एकनाथ शिंदे यांच्याशी साडेचार तास चर्चा केली आणि त्यांच्या मनात उठावाची बीज पेरलं, असा गौप्यस्फोट विजय शिवतारे यांनी केला.
नंदनवनमध्ये साडेचार तास चर्चा करताना मी एकनाथ शिंदे यांना सांगितलं हे चालणार नाही. हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंना सांगा. प्रेशर करा हे तोडलं पाहिजे. भाजप सेनेचं सरकार आलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या 70 सीट घालवल्या. उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मतदारसंघात माणसं कामाला लावली. त्यामुळे भाजपनेही शिवसेनेचे मंत्री पाडले. हे सर्व उद्धव ठाकरे यांच्यामुळेच झालं, असंही त्यांनी सांगितलं.
निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीशी सेटलमेंट झाली होती. कोणत्या सीट पाडायच्या, कोणत्या विजयी करायच्या आणि आकडेवारी कशी जुळवून आणायाची हे कट कारस्थान निवडणुकी आधीच झालं होतं. महाविकास आघाडीनंतर झाली नाही. ती आधीच झाली होती. हे फसवत आहेत, असा दावा त्यांनी केला.