मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोन, अजित पवार पुणे दौरा रद्द करुन थेट मुंबईच्या दिशेला रवाना
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. दौऱ्याचा अंतिम टप्पा बाकी असताना ते दौरा अर्धवट सोडत मुंबईच्या दिशेला रवाना झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आल्यानंतर अजित पवार तात्काळ मुंबईच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. दौऱ्याचा अंतिम टप्पा बाकी असताना ते दौरा अर्धवट सोडत मुंबईच्या दिशेला रवाना झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोन आल्यानंतर अजित पवार तात्काळ मुंबईच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अजित पवारांनी फोन आल्यानंतर तात्काळ पुण्याच्या अशोकनगरमधील जलतरण तलावाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयत्या वेळी रद्द केला. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेला रवाना झाले.
अजित पवार आज दिवसभर पुण्यात
अजित पवार आज दिवसभर पुण्यात होते. त्यांनी सकाळी दहा वाजता कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर पुण्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यांच्या आजच्या दौऱ्यामधला शेवटचा कार्यक्रम हा अशोकनगरमधील जलतरण तलावाच्या उद्घाटनाचा होता. मात्र, त्यांना शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अचानक फोन आला. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईच्या दिशेला रवाना व्हावं लागलं. जो कार्यक्रम अजित पवारांचा हस्ते होणार होता त्या कार्यक्रमालाही अजित पवार येऊ शकले नाहीत.
अचानक मुंबईला रवाना होण्यामागचं नेमकं कारण काय?
अजित पवार यांनी अर्धवट दौरा सोडून मुंबईच्या दिशेला रवाना होण्यामागचं नेमकं काय कारण आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र अजित पवार दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी अजित पवार पुण्यात असतात. तसेच शनिवारी अजित पवार यांचा बारामती दौरा असतो. अजित पवार यांनी ज्यापद्धतीने दौरा अर्धवट सोडलाय त्यावरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
किरीट सोमय्यांच्या आरोपांना अजित पवारांचं उत्तर
दरम्यान, अजित पवार यांनी आज पुणे दौऱ्यावर असताना पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना रोखठोक प्रत्युत्तर दिलं. अजित पवार यांनी कोणता कारखाना किती कोटीला विकला गेला आणि तो कुणी घेतला याची यादीच आज जाहीर केली. अनेक कारखाने स्वत: सरकारनेच 3 ते 5 कोटी विकल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून देत साखर कारखाने आम्ही मातीमोल भावाने विकले कसे म्हणता? असा सवालही केला.
अजितदादांची यादी
यावेळी अजित पवार यांनी राज्यातील किती साखर कारखाने विकले गेले आणि कुणी विकत घेतले याची यादीच पत्रकार परिषदेत जाहीर केली. 65 साखर कारखाने महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात विकले गेले तर काही चालवायला दिले गेले आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 64 सहकारी साखर कारखाने वेगवेगळ्या कंपनीने विकत घेतले. काही लोकांनी चालवायला घेतले तर काहींनी इतरांना चालवायला दिले. पण काही लोक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत, असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा : गोड बातमी! पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाला परवानगी; अजित पवारांची मोठी घोषणा
अजित पवारांचा आजच्या भाषणाचा व्हिडीओ बघा :