मंत्री विजयकुमार गावित यांच्या अडचणी वाढवणारी बातमी, राज्य महिला आयोग मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत
राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. विजयकुमार गावित यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी महिला आयोग कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
पुणे | 22 ऑगस्ट 2023 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. गावित यांच्या वक्तव्याची गंभीर दखल महिला आयोगाने घेतलीय. महिला आयोगाकडून विजयकुमार गावित यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. विजयकुमार गावित यांच्याकडून तीन दिवसात नोटिशीचा खुलासा आल्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. विजयकुमार गावित यांनी मासे खाल्ल्याने चेहरा चिकना आणि डोळे ऐश्वर्या राय सारखे होतात. त्यामुळे मासे खावून कुणालाही पटवून घेता येतं, असं वक्तव्य केलंय. त्यामुळे वाद निर्माण झालाय.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलीय. “विजयकुमार गावित यांनी सार्वजनिक कार्यक्रमात काही गोष्टी सांगत असताना जो उल्लेख त्यांनी केला ते पाहता, त्यांचं वक्तव्य निश्चितच महिलांचं अपमान करणारं आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन राज्य महिला आयोगात काही तक्रारी प्राप्त झाल्या. त्याची दखल घेत राज्य महिला आयोगाने विजयकुमार गावित यांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये त्यांना तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे”, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या?
“यापूर्वीदेखील सभागृहात अशापद्धतीने महिलांच्या बाबतीत वक्तव्ये केली गेली आहेत. जाहीर सभांमध्ये बोललं जातं. याबाबत पक्षांनीच भूमिका ठरवली पाहिजे. प्रत्येकवेळेस तुम्हाला उदाहरणं देताना महिलांचा गरज कशाला लागते? त्यांच्याबरोबर तुलना करायची गरज काय?”, असे प्रश्न रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केले.
“एक समाजाची मानसिकता असली पाहिजे. महिलेचा सन्मान केला गेला पाहिजे. गावित यांच्या वक्तव्याप्रकरणी कडक कारवाई करण्याची आम्ही शिफारस करु. तसेच कायद्यात याबाबत दुरुस्ती करता येईल का, याबाबतच चर्चा करण्यासाठी समिती स्थापन करु”, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.