Pune crime : प्रतिकार केला म्हणून गळ्यावर सपासप वार, कपड्याच्या दुकानातल्या महिलेच्या खूनप्रकरणी तरुणाला रांजणगावातून अटक
तपासात असे दिसून आले आहे, की महिलेच्या दुकानात तिला लुटण्याच्या उद्देशाने संशयित गेला होता. परंतु तिने प्रतिकार केल्याने त्याने तिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले.
पुणे : महिलेच्या हत्येप्रकरणी (Women murder) एका तरुणाला रांजणगावातून अटक करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch of Pimpri Chinchwad Police) एका 24 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. 31 वर्षीय महिलेची भोसरी येथे 16 ऑगस्ट रोजी धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना त्याच्याबद्दल सुगावा मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित महिला पूजा ब्रजकिशोर प्रसाद (31) ही लोंढे आळी परिसरातील तिच्या कौटुंबिक मालकीच्या कपड्याच्या दुकानात 16 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आली होती. प्राथमिक तपासात धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. तिचा गळा कापण्यात आला होता. याप्रकरणी महिलेच्या पतीने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली होती.
सीसीटीव्ही तपासणी
महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हत्येचा तपास सुरू केला आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेनेही समांतर तपास सुरू केला आहे. परिसरातील सुरक्षा कॅमेर्याचे फुटेज पोलिसांनी तपासले आहे. संशयितांच्या हालचाली या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यातून महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. पोलिसांनी भोसरी आणि चाकणमधील औद्योगिक भागातील 250हून अधिक सुरक्षा कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
औद्योगिक क्षेत्र परिसरात चौकशी
तपास पथकाने औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडे मोठ्या प्रमाणात चौकशी केली. रांजणगाव परिसरात ब्युटी पार्लरच्या मालकीच्या महिलेचा मोबाइल आणि रोकड चोरीमध्ये तत्सम वर्णन असलेल्या संशयिताचा सहभाग असल्याची माहिती पथकाला मिळाली. चोरीच्या प्रकरणातील सुरक्षा कॅमेऱ्याच्या फुटेजच्या तपासणीत खून आणि चोरीच्या गुन्ह्यातील संशयित एकच असल्याची खात्री झाली, असे पोलीस उपायुक्त (गुन्हे) काकासाहेब डोळे यांनी सांगितले.
गुन्हेगारी पार्श्वभूमी
शुक्रवारी उशिरा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना संशयिताच्या ठिकाणाबाबत गुप्त माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून रामकिशन शंकर शिंदे (24, रा. ता. शिरूर, जि. पुणे) या संशयिताला अटक केली. पुढील तपासात शिंदेचे गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचे स्पष्ट झाले असून त्याला ठाणे पोलिसांनी यापूर्वी दरोडा आणि लोकांची फसवणूक करून मोबाइल घेऊन पळून जाण्याच्या दोन गुन्ह्यात अटक केली होती.
प्रतिकार केल्याने वार
तपासात असे दिसून आले आहे, की महिलेच्या दुकानात तिला लुटण्याच्या उद्देशाने संशयित गेला होता. परंतु तिने प्रतिकार केल्याने त्याने तिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला, असा संशय आहे, असे डीसीपी डोळे म्हणाले.