पुणे : परदेश दौऱ्याची व्यवस्था करून देण्याच्या बहाण्याने 50 हजार रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याचा आरोप एका तरुणीने केला आहे. या 28 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर कल्याणीनगर येथील रहिवाशाविरुद्ध वाकड पोलिसांनी (Wakad police) रविवारी गुन्हा दाखल केला. वाकड पोलीस स्टेशनमधील उपनिरीक्षक आरएम मासाळ यांनी सांगितले, की तक्रारदार महिला एका खासगी बँकेत डेप्युटी मॅनेजर आहे आणि या वर्षी मार्चमध्ये डेटिंग अॅपद्वारे (Dating app) त्या व्यक्तीला भेटली होती. एकमेकांशी ओळख झाल्यानंतर त्यांनी त्यांचे मोबाइल नंबर शेअर केले आणि चॅटिंग सुरू केले. त्या व्यक्तीने देखील सोशल मीडियावर महिलेला फॉलो करण्यास सुरुवात केली, असे मासाळ म्हणाले. 11 मार्च रोजी तो पुरुष महिलेच्या घरी आला आणि त्याने तिला एप्रिलच्या मध्यात परदेशात सहलीसाठी येण्याची ऑफर दिली. महिलेने पोलिसांना सांगितले, की संबंधित व्यक्तीने त्यावेळी तिच्याकडे शरीरसुखाची मागणीही केली.
मासाळ म्हणाले, की 21 मार्च रोजी तो माणूस पुन्हा महिलेच्या घरी आला आणि मालदीवला जाणार असल्याचे पटवून तिच्या पासपोर्टची प्रत आणि तिच्याकडून 50,000 रुपये घेतले. तो 26 मार्चपर्यंत महिलेच्या संपर्कात होता, त्यानंतर त्याने महिलेशी संपर्क करणे थांबवले. पोलिसांच्या माहितीनुसार, ही महिला सतत त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती, मात्र त्याचा मोबाइल नंबरपर्यंत ती पोहोचू शकत नव्हती.
यासर्व प्रकारानंतर या महिलेला संशय आला, कारण तो पुरुष त्यांच्या नियोजित तारखेला टूरसाठी आला नाही. तिने एप्रिलपर्यंत वाट पाहिली आणि त्या व्यक्तीने आपली फसवणूक केल्याचे तिला समजले. रविवारी तिने पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली, असे अधिकारी म्हणाले. तर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (महिलेवर अत्याचार किंवा गुन्हेगारी बळजबरी करणे), 406 (गुन्हेगारी विश्वासाचा भंग) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.