बारामती | 20 ऑक्टोबर 2023 : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची आज संध्याकाळी बारामतीत जाहीर सभा पार पडली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण का महत्त्वाचं आहे? याविषयी विश्लेषण केलं. यावेळी त्यांनी मराठ्यांच्या घरातील सध्या परिस्थितीत काय विदारक वास्तव्य आहे, या विषयी अत्यंत मार्मिकपणे भाष्य केलं. “आपल्याला जो विषय हाताळायचा आहे तर त्याच्या मुळात जा. जे आरक्षणाच्या मुळात गेले त्यांनी आरक्षण घेतलं. आपल्याला जीवन जगण्यासाठी पाणी गरजेचं आहे तेवढंच भविष्यात अस्तित्व टिकवण्यासाठी आरक्षण गरजेचं आहे”, असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
“मराठा समाजाला चारही बाजूंनी घेरलं आहे. मराठ्यांना काही कळू द्यायचंच नाही, असं चहू बाजूंनी घेरुन ठेवलं आहे. खाणार आपलं, जगणारपण आपल्याच जीवावर पण काही द्यायची वेळ आली की मराठा घेरलाच म्हणून समजा. आणखी तरी सावध व्हा. आपलं हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी आता मागे सरकू नका. मराठ्यांना अशी संधी पुन्हा येणार नाही. ही पहिली आणि शेवटची संधी आहे. हे आंदोलन देखील पहिलं आणि शेवटचं आहे”, असं मनोज जरांगे यावेळी म्हणाले.
“आपण आरक्षणाच्या मुळात गेलो नाहीत. आपण खूप सभा घेतल्या. पण लेकरांच्या भविष्याच्या मुळात आपण गेलो नाहीत. आता मराठ्यांनी घराघरात आरक्षण समजून घेतलं. आपलेसुद्धा ज्यांना आरक्षण माहिती होतं त्यांनी आपल्याला आरक्षण शिकवलं नाही. आपल्यातसुद्धा इतके नमूने भारी आहेत की, त्यांना आरक्षण माहिती असूनसुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलं नाही. याचं कारणसुद्धा तसंच आहे. त्याला वाटतं की, याला शिकवलं, हा हुशार झाला तर माझ्याकडे येणार नाही. याचा अर्थ याच्याकडे यावं म्हणून यांनी आपल्याला शिकवलं नाही आणि आपल्या पिढ्या बरबाद झाल्या”, असा दावा जरांगे यांनी केला.
“हाताखालून एवढं मोठं आरक्षण निघून गेलं तरी आपण बेसावध राहिलो. आई-बापाने कष्ट करायचे, पोरं शिकवायची, पैसे कमी पडले तर व्याजाने काढायचे, पण पोरं शिकवायची. बापाचं, आईचं आणि मुलाचं स्वप्न एकच. बापाचं स्वप्न एकच की, काबाडकष्ट करुन लेकरं शिकवले, पण माझ्यासारखे कष्ट माझ्या मुलाच्या वाट्याला यायला नको. त्याला नोकरी लागलीच पाहिजे म्हणून आम्ही कष्ट करतोय हे आई-बापाचं स्वप्न”, असं मनोज जरांगे म्हणाले.
“मुलाचं किंवा त्या मुलीचं स्वप्न असतं की, माझ्या आई-वडिलांनी बघितलेलं स्वप्न मला पूर्ण करायचं आहे. माझ्या आई-वडिलांच्या वाटेला आता कष्ट यायला नको. त्यांनी खूप कष्ट केले. पण दोघांचं स्वप्न धुळीस मिळालं. एका टक्क्याने हुकला आणि सुशिक्षित बेकार म्हणून घरी बसला. मुलाचं आणि बापाचं दोघांचं स्वप्न संपून गेलं. याला मूळ कारण आरक्षण”, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली.