Manoj Jarange : सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी जरांगे पाटील आग्रही; विधानसभेपूर्वी दिला राज्यकर्त्यांना असा इशारा
Legislative Assembly Election : लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. तर त्याच दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी पण जरांगे पाटील यांनी रणनीती आखली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने राज्य सरकारला मोठी धावपळ करावी लागली होती. मराठा समाजाच्या सरसकट कुणबीत समावेशासाठी त्यांनी रान पेटवले. त्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्यावर्षी आणि यावर्षाच्या सुरुवातीला या आंदोलनाने प्रशासकीय यंत्रणा हादरवून सोडली. आता जरांगे पाटील यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्रासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. त्यांनी यावेळी अनेकांना इशारा पण दिला.
मनोज जरांगे पाटील यांना २०१३ साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. याप्रकरणात आज ते पुण्यातील कोर्टात हजर झाले. त्यांच्याविरोधातील वॉरंट पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाकडून रद्द करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
तर २८८ उमेदवार उभे करणार
सगे सोयरे अंमलबजावणी आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर मग विधानसभेच्या रिंगणात २८८ उमेदवार उभे करणार अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. या मागणीसाठी ४ जून पासून जरांगे आमरण उपोषण सुरू करणार आहेत.
मी जातीवर बोलत नाही
मी पाडापाडीची भाषा केली म्हणजे जातीयवाद होत नाही.आम्ही तर आवाहन केलं आहे. ते आवाहन करताना दिसत नाहीत. मी कधीच जातीवर बोललं नाही . दोन्ही समाजाला आवाहन आहे की शांत राहा.मी २३ दिवसापूर्वीच आवाहन केल होत.त्यांच्या बाजूने सुद्धा आवाहन होणं गरजेचं आहे करतेत की नाही बघू. बीड जिल्ह्यातील सामाजिक आणि जातीय परिस्थितीबाबत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी मुंडे बहिण-भाऊबद्दल हे वक्तव्य केले.
मस्ती असेल तर नाव घेऊन पाडू
मी ग्राउंड वरच्या ओबीसीला कधीच दुखावल नाही, कारण मी नेत्यांवर बोलतो. नेते हे कोणाचेच नसतात. त्यांच्याकडून शांततेचं आवाहन होत नाही. कदाचित त्यांना शांतत बिघडायची असेल. मी निवडणुकीतच नाही मग कस कळणार की कोण निवडून येईल. मी कोणाच नाव घेवून बोललो नाही की याला पाडा. पण जर मस्ती असेल तर विधानसभेत नाव घेवून पाडू असा इशारा त्यांनी यावेळी दिला. हा रोख कुणावर होता हे बीडमधील ताज्या घडामोडींवरुन लक्षात येतो.